पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांचं मत जाणून घेतलं. याच बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तोंडावर मास्क बांधून चर्चा करताना दिसून आले. याच मुद्द्यावरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिश्कील शब्दामध्ये भाष्य करत राजकारण्यांचीच फिरकी घेतली आहे. पंतप्रधान आणि इतर राज्यातील मुख्यमंत्र्याबरोबरच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीमध्ये काय झालं याची माहिती दिली.

“माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भिगिनींनो आणि मातांनो पुन्हा एकदा नमस्कार आणि जय महाराष्ट्र”, अशी खास ठाकरे शैलीमध्ये उद्धव यांनी जनतेबरोबर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून साधलेल्या संवादाला सुरुवात केली. “जवळ पास दर दोन-तीन दिवसांआड मी आपल्या समोर येतोय. आज माझा तसा आपल्यासमोर येण्याचा काही विचार नव्हता.  उद्या रविवार आहे त्यामुळे एकतर रविवारी किंवा १४ तारखेला २१ दिवसांच्या लॉकडाउनची मुदत संपतेय त्या सुमारास आपल्याशी बोलावं, असं मी मनात ठरवलं होतं.  पण आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय पंतप्रधानांनी आपल्या देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. ही आजची तिसरी की चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स होती. पहिल्या प्रथम या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माननीय पंतप्रधानांसह मी सुद्धा आणि काही राज्याचे मुख्यमंत्री हे तोंडावरती मास्क बांधून होते.  चित्र फार विचित्र होतं. म्हणजे आजपर्यंत कोणी आमच्या तोंडावरती पट्ट्या लावण्याची हिंमत केलेली नाही. कोणी आमचं तोंड बंद करु शकलेलं नाही. ती हिंमत कोणातही नाही. पण एका विषाणूने आमच्या सगळ्यांच्याच तोंडावरती पट्ट्या बांधल्या गेल्या,” अशी मिश्कील प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी संवादाच्या सुरुवातीलाच नोंदवली.

नक्की वाचा >> …तर करोनाच्या संकटावर मात करुन भारत जगातील महासत्ता होईल: उद्धव ठाकरे

पंतप्रधानांबरोबर देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर उलट सुटल बातम्या येण्यापेक्षा आपण तुमच्याशी बोलावं आणि सांगावं की आपण काय करतो आहोत, हे सांगण्यासाठी हा संवाद साधत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. याच संवादामध्ये पुढे उद्धव यांनी राज्यातील लॉकडाउनचा कालावधी आणखीन १५ दिवसांनी वाढवण्यात येत असल्याची महत्वाची घोषणा केली. राज्यामध्ये किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना देशभरातील वेगवगेळ्या राज्यांमधील मुख्यमंत्री, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार एकजुटीने काम करत असल्याचे मत मांडले.

नक्की वाचा >> “आयुष्यभर राजकारण सोडून दुसरं काय केलं? पण या गोष्टीत मला राजकारण नकोय”

“जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा महाराष्ट्र देशालाच नाही जगाला दिशा दाखवतो. संपूर्ण जगावर संकट आहे हा देशाला आणि जगाला दिशा दाखवण्याचं काम या संकटातही करणार आहे. गडबडून गोंधळून जाऊ नका. १४ नंतर ३० एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन राहिलं. उद्योग धंदे, विद्यापिठे यासंदर्भात काम सुरु आहे. १४ तारखेपर्यंत मी तुम्हाला याची उत्तरे देणार आहे. उलटसुलट बातम्या समोर येण्याऐवजी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला हे सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.