जगभरात करोनाने थैमान घातलं असून यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. दरम्यान या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थिनीशी फोनवर चर्चा केली असून धीर दिला आहे. दरम्यान भारतीय दूतावासाला विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी मनिला येथून कॉलालाम्पूरमार्गे मुंबईत येण्याचा मार्ग स्विकारला. मंगळवारी संध्याकाळी मलेशियात पोहचलेल्या या विद्यार्थ्यांना मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सकाळी सिंगापूर येथे आणण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं तिकीटही देण्यात आलं. बुधवारी दुपारी मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे बोर्डिंग पास घेण्यावेळी या विद्यार्थ्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला.