पालघर जिल्हाधिकाऱ्यांची शल्यचिकित्सकांना सूचना

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : राज्यात विविध भागांमध्ये करोनाचा झपाटय़ाने प्रसार होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. जिल्ह्यत ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची प्रतिजन चाचणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी शल्यचिकित्सकांना दिले आहेत.  त्या संदर्भात आदेश काढण्यात येणार आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच खासगी डॉक्टर आणि नागरिकांना अधिकाधिक प्रमाणात लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले आहे.  लस घेण्यासाठी  रुग्णांचे  मतपरिवर्तन करणे, सामाजिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे तसेच हाताचे र्निजतुकीकरण करण्यासाठी शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यत कोणत्याही वैद्यकीय अधिकारी किंवा खासगी डॉक्टरकडे तापाचा रुग्ण आल्यास त्याचे प्रतिजन चाचणी करून घेण्यासाठी उपाययोजना  करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यत प्रतिजन चाचणी करीत आवश्यक किट उपलब्ध असून आवश्यकता भासल्यास  आरटीपीसीआर (रॅपिड अँटी जन टेस्ट) करून घ्यावे, असे या बैठकीत सुचविण्यात आले.

ताप असणारे व करोनाची लक्षणे असणारे काही रुग्ण परस्पर एचआरसिटी (हाय रिझर्वेशन सिटी स्कॅन) परस्पर करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा केंद्रांवर तपासणी करणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत अशा रुग्णांची घरी जाऊन प्रतिजन चाचणी करून घेण्याची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे  आजार नियंत्रणात राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागात रुग्णसंख्या शंभरी पार

पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागात सक्रिय असणाऱ्या करोना रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली आहे. त्यापैकी पालघर तालुक्यात ६०, जव्हार  ५७ तर डहाणू तालुक्यात बारा रुग्णांचा समावेश आहे. गेल्या  २४ तासात ग्रामीण भागात ४२ रुग्ण वाढले आहेत. त्यापैकी ३० रुग्ण जव्हार तालुक्यामधील आहेत. करोनामुळे मृतांची संख्या ३०७ वर पोहोचली असून सध्या विविध रुग्णालयांमध्ये १३१ रुग्णावर उपचार सुरू आहेत.

‘सर्वानी लसीकरण करून घ्यावे’

करोनाविरुद्ध लढण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी लस आपल्याला उपलब्ध झाली आहे.  ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जनतेमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन  सर्व धर्मगुरूंना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या धर्मगुरूंच्या बैठकीमध्ये केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन तसेच धर्मगुरू उपस्थित होते.