चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोना विषाणु जगभर पोहोचला. करोनाच्या संसर्गामुळे इटली आणि अमेरिकेची अवस्था बिकट झाली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे १७ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ३९ हजार ४२२ जणांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे चार लाख ३२ हजार १३२ जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी १४ हजार ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी भारतातील मृतांचा आकडा १६६ वर पोहोचला. महाराष्ट्रातील विशेष मुंबईतील परिस्थिती गंभीर असून, करोनाग्रस्त रुग्ण आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

Live Blog

21:37 (IST)10 Apr 2020
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १ कोटीचं विमा कवच, पुणे मनपाचा निर्णय

सध्या देशासोबतच राज्यात करोनाननं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय कर्मचारी किंवा त्यांना मदत करणारे अन्य कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र झटत आहेत. दरम्यान, यानंतर अनेक महापालिकांनी आपल्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी रूपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

21:29 (IST)10 Apr 2020
पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न घालणाऱ्या ३० जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या ३० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांकडून कलम १८८नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंजवडी, चिखली, सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित पोलिसांनी अशा कारवाया केल्या आहेत. कारवाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

21:14 (IST)10 Apr 2020
वसईत करोनाचा चौथा बळी

वसईच्या पापडी येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्याला कर्करोग झाला होता तसेच तो करोनाबाधितही होता. या रुग्णाचा मृतदेह आज वसईत आणण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याचा मृतदेह दफन करण्यास हरकत घेतली. दरम्यान, वसईतील एकूण रुग्ण संख्या ३१ झाली असून बळींची संख्या ४वर पोहोचली आहे.

20:05 (IST)10 Apr 2020
नाशिक शहरात पोलिसांचे संचलन; नागरिकांकडून पुष्पवृष्टी

करोना विषाणूच्या प्रसाराला अटकाव व्हावा या हेतूने शहर परिसरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सातपूर तसेच पंचवटी परिसरात शुक्रवारी संचलन केले. यावेळी नागरिकांकडून पोलीस दलावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी संचलन रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती.

19:32 (IST)10 Apr 2020
सोलापूर : लॉकडाउनचा आदेश मोडून शेतकऱ्यांच्या बैठका; माजी आमदारावर गुन्हा

करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी देशभर लॉकडाउन लागू असताना सांगोला तालुक्यात टेंभू प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेतल्या. याद्वारे त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी यांच्यासह तीसजणांविरूध्द सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

19:31 (IST)10 Apr 2020
कल्याण डोंबिवलीत करोनाचे ६ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात करोनाचे सहा नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका पाच वर्षीय मुलाचाही समावेश आहे. यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्णांची संख्या ४९ इतकी झाली आहे. यापैकी ९ जणांना आतापर्यंत योग्य त्या उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

18:56 (IST)10 Apr 2020
मुंबईत एकाच दिवसात २१८ करोना रुग्ण आढळले

मुंबईत एकाच दिवसात २१८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या आता ९९३ वर पोहोचली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

18:45 (IST)10 Apr 2020
देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१, आत्तापर्यंत २०६ जणांचा मृत्यू

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ६७१ एवढी झाली आहे. मागील २४ तासात ८९६ करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत २०६ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर ५१६ जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. एएनआयने या संदर्भातले ट्विट केले आहे.

18:18 (IST)10 Apr 2020
पुण्यात दिवसभरात दोन करोनाबाधितांचा मृत्यू

पुणे शहर आणि जिल्ह्यात करोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या २४५ वर पोहोचली आहे. दरम्यान, २ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून शहरात एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

18:16 (IST)10 Apr 2020
भारताकडे ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स-आरोग्य मंत्रालय

भारताकडे करोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनच्या ३ कोटी २८ लाख गोळ्या आहेत. या गोळ्यांची भारताची सध्याची गरज १ कोटी गोळ्यांची आहे असं केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं. काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजारांवर गेली आहे. याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबेलटची भारताची सध्याची गरज १ कोटी गोळ्या आहे हेदेखील केंद्रीय आरोग्य विभागाचे सह सचिव अग्रवाल यांनी सांगितलं

18:14 (IST)10 Apr 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी तीन करोनाबाधित रुग्ण आढळले

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळले असून शहरात करोनाबाधितांचा आकडा २६ वर पोहचला आहे. यांपैकी, १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सध्या १३ जणांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

17:44 (IST)10 Apr 2020
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ICU तून आणलं बाहेर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. जॉन्सन आयसीयूमधून बाहेर आले असले तरी त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. करोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

17:41 (IST)10 Apr 2020
जळगावच्या महिला बचतगटांनी केली स्वस्त मास्कची निर्मिती

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं हे सक्तीचं झालं आहे. मात्र मास्क मिळवण्यासाठी लोकांना आजही कसरत करावी लागते आहे. शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी मास्क उपलब्ध नसतात. असलेच तर त्यांच्या किंमतीही भरपूर असतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी वीस रुपयांच्या नाममात्र किंमतीत कापडाच्या मास्कचे उत्पादन करुन ते विकण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

17:33 (IST)10 Apr 2020
EPFO कडून २८० कोटी रूपयांचे क्लेम सेटल

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर तब्बल १ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार सरकारनं आतापर्यंत तब्बल २७९.६५ कोटी रूपयांची रक्कम वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे. ईपीएफओनं गुरूवारी याबाबत माहिती दिली.

17:21 (IST)10 Apr 2020
चीनमध्ये अस्वस्थतता, वुहानमध्ये मोठं आंदोलन

करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तिथे व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. वुहानमध्ये लॉकडाउन संपला असला तरी तिथल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वाचा सविस्तर बातमी.

17:15 (IST)10 Apr 2020
पंजाबमध्ये १ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा

पंजाब एक मे पर्यंत लॉकडाउनमध्ये राहणार. आज सकाळीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीचकोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत चाचणीचे प्रमाण कमी आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले.

16:35 (IST)10 Apr 2020
बीडमध्ये गुटख्याची तस्करी; ४० कोटींचे 'कुपन' जप्त

गुटखा विक्रीला कायदेशीर बंदी असताना भंगाराच्या दुकानातून गुटखा, सुगंधीत पान मसाला खरेदी-विक्रीचे ४० कोटी २४ लाख २६ हजार कोटींचे कुपन (सवलतीच्या चिठ्ठ्या) पोलिसांनी जप्त केले आहेत. कूपननुसार गुटखा आणि पान मसाल्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी शुक्रवारी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गुटखा विक्री बंदी असली तरी वेगवेगळ्या पद्धतीने काळाबाजार सुरू असल्याचेच पोलीस कारवाईतून समोर आले आहे.

16:33 (IST)10 Apr 2020
१४ एप्रिलला लॉकडाउन संपणार का? नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करण्याची शक्यता

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. (सविस्तर वृत्त)

16:32 (IST)10 Apr 2020
पालघर : कर्जबाजारी मच्छिमारांना अर्थसहाय्य करावं; मच्छिमारांची मागणी

यंदाच्या मासेमारी हंगामामध्ये लांबलेला पाऊस, आलेली चक्रीवादळ व नंतर करोना संकटामुळे बंद पडलेल्या मासेमारीमुळे जिल्ह्यातील मच्छिमार हा कर्जबाजारी झाला आहे. पुढील हंगामासाठी मच्छिमारांकडे कोणत्याही प्रकारचे भांडवल असून विद्यमान घेतलेल्या कर्जाची व्याजमाफी करावी, कर्जाची परतफेड करण्यासाठी सुलभा हप्ते पाडून सुविधा करून देण्यात यावी तसेच जिल्हा सहकारी बँकेकडून पतस्थैर्य निधी वितरण करून बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी सातपाटी येथील मच्छीमारांनी केली आहे.

16:29 (IST)10 Apr 2020
पालघर: लॉकडाउनच्या काळातही कंपनी सुरु; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, उत्पादन बंद करण्याचे आदेश

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही हजारो कामगारांचा आणि परिसरातील लाखो लोकांच्या जीवाची पर्वा न करता काम सुरु ठेऊन उत्पादन घेणाऱ्या विराज प्रोफाइल प्रा. लिमिटेड या तारापूर येथील कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला. या कंपनीच्या सर्व चार कारखान्यांमधील उत्पादन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

15:51 (IST)10 Apr 2020
वसई-विरारमध्ये आज दोन नवे रुग्ण आढळले; एका पोलिसाचाही समावेश

वसई-विरार शहरातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी दोन नव्या रुग्णांची नोद झाली. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर दुसरा व्यक्ती नालासोपाऱ्यातील आहे. यामुळे वसईतील करोनाबाधीत रुग्णांची संख्या आता ३१ एवढी झाली आहे. यामध्ये वसईत १३, नालासोपारामध्ये १४ आणि विरारमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, वसईच्या साईनगर येथील एक करोनाबाधीत तरुणी करोनामुक्त झाली आहे. तर एकूण ३ जणांचा आतापर्यंत करोनामुळे बळी गेला आहे.

15:45 (IST)10 Apr 2020
सोशल मीडियातून अफवा पसरविल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून अफवा पसरवल्याप्रकरणी राज्यात १३५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक १९ गुन्ह्यांची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे. तर प्रशासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही तब्बल साडेसातशे व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

15:29 (IST)10 Apr 2020
दादरमधल्या 'शुश्रुषा'च्या दोन नर्सेस करोना पॉझिटिव्ह, रुग्णालय होणार सील

मुंबईतल्या दादरमध्ये असलेल्या शुश्रुषा रुग्णालयातल्या दोन नर्सेसना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्णालय सील करण्याची तयारी सुरु झाली आहे. रुग्णालयातील इतर सर्व परिचारिकांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकाही नव्या रुग्णाला दाखल करुन घेऊ नका आणि जे रुग्णालयात दाखल आहेत त्यांना पुढील ४८ तासात डिस्चार्ज द्या असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.

15:08 (IST)10 Apr 2020
१५ एप्रिलनंतर ट्रेन सुरू होणार की नाही? रेल्वे मंत्रालय म्हणतं...

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानंही लॉकडाउन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ पासून रेल्वे सुरू होणार की नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. लॉकडाउन पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी आतापर्यंत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात कोणताही निर्णय झाल्यास तो सर्वांना सांगितला जाईल, असंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

14:58 (IST)10 Apr 2020
Lockdown : उसमें क्या है? सुबोध भावेने हटके स्टाइलमध्ये मानले पोलिसांचे आभार

देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे या बंदच्या काळात कोणताही नागरिक अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहेत. विशेष म्हणजे दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. पुढे वाचा...

14:55 (IST)10 Apr 2020
चप्पल आणि बुटांच्या माध्यमातूनही पसरतोय करोना? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

काही संशोधकांनी चप्पल आणि बुटांवर करोनाचा विषाणू पाच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो असा दावा केला आहे. बहुतांश चपला या रबर किंवा प्लॅस्टीकच्या बनवलेल्या असतात तर बूट हे चामड्याचे असतात. त्यामुळेच तुमच्या चपला हा विषाणूसाठी वाहकाचे काम करु शकतात. म्हणजेच चपलांमधूनही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.येथे वाचा सविस्तर वृत्त

14:51 (IST)10 Apr 2020
पुणे : मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर येथील उपबाजारही राहणार बंद

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व बाजारांमधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विक्री आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. सविस्तर वृत्त वाचा

14:36 (IST)10 Apr 2020
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाउन वाढवण्याचे संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंबंधी निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीचकोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत चाचणीचे प्रमाण कमी आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले.


14:36 (IST)10 Apr 2020
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाउन वाढवण्याचे संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंबंधी निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये आज १३२ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आम्ही २८७७ नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबची लोकसंख्या अडीचकोटी पेक्षा जास्त आहे. त्यातुलनेत चाचणीचे प्रमाण कमी आहे असे अमरिंदस सिंग म्हणाले.

13:59 (IST)10 Apr 2020
सहकारी बँका, साखर कारखाने यांना सरकारी हॉस्पिटल चालवू द्या; रोहित पवारांनी मांडला प्रस्ताव

रोहित पवार यांनी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का अशी विचारणा केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “करोनाच्या पार्श्वभूमीवर सक्षम असलेल्या सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ यांना सरकारी हॉस्पिटल चालवण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा देण्यास मदत होईल”. (सविस्तर वृत्त)

13:49 (IST)10 Apr 2020
१३० कोटींच्या देशात नर्सेस किती? डॉक्टर्स किती ठाऊक आहे?

आपल्या देशासह संपूर्ण जगातले आरोग्य कर्मचारी हे एका महाभयंकर रोगाशी लढत आहेत. ज्याचं नाव आहे करोना व्हायरस. आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी सध्या मोलाचं सहकार्य करत आहेत. ज्यांना आपण सिस्टर्स म्हणतो त्या नर्सेसची भूमिका या सगळ्या सेवेत महत्त्वाची असते. या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत WHO, ICN यांनी एक अहवाल समोर आणला आहे.भारतात नर्सेसचं प्रमाण कमी आहे. २१०८ पर्यंतची आकडेवारी सांगते की १३० कोटींच्या देशात नर्सेसची संख्या १५.६ लाख आहे. तर ७ लाख ७२ हजार नर्सिंग सहयोगी कर्मचारी आहेत. ४७ टक्के मेडिकल स्टाफ, २३.३ टक्के डॉक्टर, तर अवघे ५.५ टक्के डेन्टिस्ट आहेत.

13:44 (IST)10 Apr 2020
कर्नाटक सरकार ३० एप्रिलपर्यंत शटडाउनसाठी अनुकूल

२१ दिवसांपासून असलेले लॉकडाउन काही प्रमाणात उठवण्यात यावे हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलचा सल्ला कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने फेटाळून लावला आहे. याउलट ३० एप्रिलपर्यंत शटडाउनसाठी अनुकूल असल्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत.

13:36 (IST)10 Apr 2020
अजिंक्यची लहानगी मुलगी म्हणतेय, घराबाहेर पडायचं नाही

अजिंक्यची पत्नी राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर वृत्त

13:29 (IST)10 Apr 2020
सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकाल तर होईल शिक्षा

राज्यात एकीकडे करोनाचं संकट असताना पोलिसांसमोर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांनाही रोखण्याचं आव्हान आहे. करोनासंबंधी येणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर सर्रासपणे शेअर, फॉरवर्ड होत असताता.तुम्हीदेखील असे मेसेज शेअर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे कारण सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकल्यास जेलमध्ये जावं लागू शकतं. मुंबई पोलिसांनी यासंबंधी पत्रक जारी केलं आहे.

काय केल्याने होऊ शकते शिक्षा -

१) व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेली माहिती खोटी किंवा तथ्याशी छेडछाड करणारी असल्यास कारवाई होऊ शकते.

२) एखाद्या समाजाविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्यास

३) सामान्यांमध्ये भीती तसंच गोंधळ निर्माण केल्यास

४) सरकारकडून करोनासंबंधित घेतलेल्या निर्णयांवर तसंच प्रशासनावर अविश्वास दाखवत जीवाला धोका निर्माण करणे तसंच गोंधळाचा परिस्थिती निर्माण करणे.

12:52 (IST)10 Apr 2020
आपण एकत्र मिळून लढू, मोदींचा नेतान्याहू यांना संदेश

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा पुरवठा केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी आभार मानल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांना प्रतिसाद दिला आहे. या कठिण काळात भारत आणि ब्राझीलची मैत्री अधिक बळकट झाली आहे असे मोदींनी म्हटले आहे.

12:45 (IST)10 Apr 2020
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे शहरात १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ रुग्ण नायडू रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता पुणे शहरात रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

12:21 (IST)10 Apr 2020
महाराष्ट्रात १६ नवे पॉझिटिव्ह, करोनाग्रस्तांची संख्या १३८०

महाराष्ट्रात १६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही १३८० झाली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. 

11:55 (IST)10 Apr 2020
दिलासादायक : पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच करोनाबाधित झाले पूर्ण बरे

राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच ताण हलका करणारी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, पाच रुग्ण बरे झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुढे वाचा...

11:41 (IST)10 Apr 2020
Covid-19 विरोधात मोदी सरकारने बनवला तीन टप्प्यांचा प्लान

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा प्लान तयार केला आहे. आपातकालीन परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या तयारीसाठी मोदी सरकारने राज्यांना पॅकेज जारी केले आहे. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा या पॅकेज मागचा उद्देश आहे.

11:34 (IST)10 Apr 2020
सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरवरच निलंबनाची कारवाई

सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरलाच निलंबित करण्यात आल्याचा प्रकार आंध्र प्रदेशात घडला आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील विरोधी पक्षातील नेत्याने शेअर केला होता. या व्हिडीओत डॉक्टर सुधाकर राव सुरक्षेचे उपाय आणि मास्क नसल्याची तक्रार करताना पोलिसांच्या गैरवर्तवणुकीबद्दलही बोलत होते. रुग्णालयातील जिल्हा समन्वयक गरजेच्या वेळी उपस्थित नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसंच परिस्थिती गंभीर असताना एकाही मंत्र्याने औषधांचा मुबलक साठा आहे की नाही याची पाहण्याची करण्याती तसदी घेतली नसल्याचंही ते म्हणाले होते. (सविस्तर वृत्त)