५० ते ६० वर्षे वयोगटातील ११७ जणांचे मृत्यू

सुहास बिऱ्हाडे/कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसई-विरारमधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल १४४ जणांचे मृत्यू झाले. शहर आणि ग्रामीण परिसरात मागील पाच महिन्यात ३९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात ११९ महिला आणि २७३ पुरुषांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ११७ मृत्यू हे ५० ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. तर तिशीच्या आतील १२ जण दगावले आहेत.

सद्य:स्थितीत दिवसाला सरासरी १५० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. तर साधारणपणे ४ ते ५ रुग्ण दिवसागणिक दगावले जात आहेत. आतापर्यंत वसईत शहरी व ग्रामीण असे एकूण १७  हजार ८८२  रुग्ण आढळून आले आहेत.  यामध्ये ३९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जुलै  महिन्याच्या अखेरपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील मृतांची संख्या ही केवळ २६० इतकी होती. मात्र ऑगस्ट महिन्यात १४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

जून महिन्यात १२८ तर  जुलै महिन्यात १२९ जणांचा बळी गेला होता. परंतु ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. जून व जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये १६ ने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

बाधितांच्या संख्येत घट

शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ  लागली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात २ हजाराने घटली आहे. जुलै महिन्यात वसई-विरार शहराच्या हद्दीत ७ हजार ३११ रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑगस्ट  महिन्यात रुग्णांचे प्रमाण २ हजार २९७ ने कमी झाले आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी व ग्रामीण मिळून ५ हजार १४ रुग्ण आढळून आले आहेत.

८६ टक्के रुग्ण करोनामुक्त

वसई-विरार शहराची हळूहळू करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू  झाली आहे. आतापर्यंत वसईत शहरी व ग्रामीण भागांत १७ हजार ९१३ करोना बाधित आढळून आले आहेत. त्यातील १५ हजार ४५१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच ८६.२५  टक्के  रुग्णांनी आजवर करोनावर मात केली आहे.

५० ते ६० वर्षे वयोगटात सर्वाधिक मृत्यू

आतापर्यंत वसईत शहरी व ग्रामीण असे एकूण १७  हजार ८८२ रुग्ण आढळून आले आहेत.  यामध्ये ३९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात ११९ महिला आणि २७३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे २९७ मृत्यू हे पन्नाशी ओलांडलेल्या रुग्णांचे आहेत, तर पन्नाशीच्या आतील ९५ रुग्ण दगावले आहेत. तिशीच्या आतील १२ रुग्ण दगावले आहेत.

मृत्यूची आकडेवारी

जून —          १२८ मृत्यू

जुलै—           १२९ मृत्यू

ऑगस्ट—       १४४ मृत्यू

रुग्णांना सर्वात जलद उपचार मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ४ कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका देखील आणल्या आहेत. कोविड उपचार केंद्रात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांनीही आजाराची कुठलीही लक्षणे असतील तर त्वरित तपासणी करून घ्यावी.

-गंगाथरन डी. आयुक्त, वसई-विरार महापालिका

विविध उपाययोजनांमुळे संसर्गाचे प्रमाण नियंत्रित आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विविध उपाययोजना करत असल्याने रुग्णवाढीला आळा बसविण्यात यश आले आहे. चाचण्या जास्त होत असल्याने रुग्ण लवकर समोर येतो आणि त्याच्यावर वेळीच उपचार केले जातात.

डॉ. तबस्सूम काझी,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका