उपचारासाठी पोलीस अधीक्षकांना दूरध्वनी

हिंगोली : ‘मी आजारी आहे, गावी वडील आजारी आहेत. जवळ पैसे नाहीत. पोलीस असलो तरी कोणी नीट उपचार करत नाही.’ अशा आशयाचा दूरध्वनी पोलीस अधीक्षकास करणारे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. कोविड काळजी केंद्रात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर येथील रहिवासी असलेले सचिन पांडुरंग इंगोले (वय ३५) हे हिंगोली पोलीस दलात २००८ मध्ये भरती झाले होते. मागील तीन वर्षांपासून ते गोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

टाळेबंदीच्या बंदोबस्तावर कार्यरत असतांना त्यांना ताप येऊ लागला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांनी उपचार चांगले मिळावेत म्हणून पोलीस अधीक्षकांना दूरध्वनी केले. पण ते संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या वडिलांवर कोविडचे उपचार सुरू आहेत.

पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड काळजी केंद्र

जिल्ह्यात मागील एक वर्षांपासून २४ तास कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी पोलीस विभागाच्या पुढाकारातून स्वतंत्र ४० खाटांचे कोविड केअर सेंटर बुधवार पासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी लक्षणे नसलेल्या पण कोविड सकारात्मक रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.