सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ाचे महापालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडले असून त्यामुळे या महिनाअखेपर्यंत पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा नदीवरील टाकळी-औज बंधाऱ्यातील पाणीसाठा केवळ अर्धा मीटर एवढाच शिल्लक आहे. तर उजनी धरणातून गेल्या १७ मे रोजी सोडलेले पाणी टाकळी बंधाऱ्यात पोहोचण्यास विलंब लागणार आहे. हे पाणी टाकळी बंधाऱ्यात पोहोचण्यास एका आठवडय़ाचा कालावधी अपेक्षित आहे.
टाकळी-औज बंधाऱ्यात सध्या केवळ पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर हिप्परगा जलाशयही यापूर्वीच कोरडे पडल्यामुळे आता केवळ उजनी धरण ते सोलापूर थेट जलवाहिनी योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात देखील उजनी धरणातील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात घटल्यामुळे तेथून दुबार पंपिंग करून पाण्याचा उपसा करावा लागत आहे. आतापर्यंत शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. आता त्यात वाढ होऊन चार दिवस नव्हे तर पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडातील पाणी पळाले आहे.