‘डाव मांडून..भांडून.. खेळ मोडू नको’ म्हणत एका दाम्पत्याने घटस्फोटासाठी केलेला आटापिटा मोडून पुन्हा एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. पतीच्या छळास कंटाळून माहेरी आलेल्या विवाहित तरुणीने वर्षांच्या पतिविरहानंतर पतीबरोबरच पलायन करीत पुन्हा संसार मांडण्याचा निर्णय घेतला.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, की सांगलीच्या गणेशनगर येथे राहणाऱ्या अमृता िशदे हिचा हुबळीतील प्रकाश दोडमण्णी याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही हुबळी येथे वास्तव्यास होते. वर्षभर सुरळीत संसार सुरू असताना दोघांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. वर्षभर वादातच एकत्र नांदण्याचा प्रयत्न केला, मात्र वाद पराकोटीला पोहोचल्याने अमृताने गेल्या वर्षी माहेरी सांगलीत राहणे पसंत केले.
माहेरी आल्यानंतर अमृताने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी सुनावणी होती. तत्पूर्वी पती प्रकाश याने पत्नीचा विरह असह्य झाल्याने दि. ८ व १४ ऑक्टोबर रोजी सांगलीला येऊन पत्नी अमृताशी संपर्क साधला. झाले गेले गंगेला मिळाले म्हणत पुन्हा संसार थाटण्याची विनवणी त्याने पत्नीला केली.
दरम्यान, दि. १९ ऑक्टोबर रोजी अमृता क्लासला गेली. ती घरी परतली नाही म्हणून माहेरच्या लोकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तिच्या भ्रमणध्वनीच्या क्रमांकावरून ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दहा दिवसांनी मंगळवारी दोघे पती-पत्नी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि आम्ही पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून ‘नांदा सौख्य भरे’चा आशीर्वाद दिला.