मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याविरुद्ध १९९१ मध्ये ३२४ कलमाखाली दाखल झालेल्या एका प्रकरणातून २४ तासात मुक्त झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्यावरील आरोपपत्र रद्दबातल करण्याचा निवाडा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस १९९१ मध्ये पश्चिम नागपूर भाजपचे पदाधिकारी असताना नागपुरातील ‘पराते कंपाऊंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भूखंडावरील बांधकाम काढण्याच्या घटनेतून वाद निर्माण झाला होता. ही घटना ७ जून १९९१ मध्ये घडली होती. या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरुद्ध गुन्हे नोंदविले गेले होते. मुख्यमंत्री आणि संबंधितांनी सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी आणि फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी २२ डिसेंबरला उच्च न्यायालयात दाखल केला. या अर्जावर २३ डिसेंबरला सुनावणी घेण्याची विनंती अर्जदारांनी केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. दोन्ही अर्जावरील सुनावणीअंती न्यायालयाने मुख्यमंत्र्यांसह अन्य अर्जदारांविरुद्ध गुन्हा रद्दबातल करण्याचा निकाल दिला.              
या सुनावणीच्या वेळी फौजदारी अर्ज क्रमांक ८२४/ २०१४ मधील अर्जदार क्रमांक एक हृदयकुमार बाबुलाल पराते आणि अर्जदार क्रमांक दोन मदनलाल बाबुलाल पराते न्यायालयात स्वत: हजर होते. या अर्जातील अर्जदार क्रमांक ४ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे वकील न्यायालयात उपस्थित
होते. दोन्ही बाजूचे लोक शेजारच्या परिसरात राहत आहेत. त्यांना परिसरात शांतता आणि सौहार्द टिकवायचे आहे म्हणून त्यांनी हा वाद मिटविण्याचा आणि फौजदारी प्रक्रियेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या सक्षम या अर्जावर सुनावणी झाली.
विशेष म्हणजे, या अर्जावर सुनावणी झाली तेव्हा नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. फौजदारी अर्जावर फडणवीस यांचे चौथ्या क्रमांकावर नाव होते. त्यात त्याचा व्यवसाय सामाजिक कार्यकर्ता, असे नमूद केलेले होते. उच्च न्यायालयात आरोपपत्र रद्दबातल करण्यासाठी दोन फौजदारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

नेमके गुन्हे कोणते?
फडणवीस यांच्याविरुद्ध १९९१ मध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात भादंवि १४७, १४८, १४९ (दंगा घडवणे), २९४ (अश्लील शिवीगाळ करणे), ४४८ (दुसऱ्याच्या घरात अनधिकृत प्रवेश करणे), ३२४ (जाणीवपूर्वक गंभीर दुखापत करणे), ३३६ आणि ४२७ (मालमत्तेचे नुकसान करणे) या कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता.