06 March 2021

News Flash

देवेंद्र फडणवीसांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी – छत्रपती संभाजीराजे भोसले

माझ्यासह सगळ्यांचा भावना दुखावल्या आहेत

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कोल्हापूरमधील शाहू प्रेमी जनतेनं याचा निषेध करत फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी एक ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर काही वेळातच संभाजीराजेंनी एक ट्विट केलं. ज्यात फडणवीसांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला ट्रोल करतोय म्हणून कार्यकर्ते निवेदन सादर करायला जातील”

प्रकरणावर भूमिका मांडताना काय म्हणाले होते छत्रपती संभाजीराजे भोसले?

छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही! छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेव्हा केली गेली, तेव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजामधील माझ्या चालू भाषणात जेव्हा मला हे कळलं तेव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तेव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?

काल माझ्या घरगुती कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याने, समाज माध्यमांमध्ये घडत असलेली चर्चाही मला माहिती नव्हती. त्याआधी दिवसभरात माझ्या सहकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाची तसेच आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाची पोस्ट करायला सांगितली होती.

संध्याकाळी जेव्हा मी फोन चालू केला तेव्हा पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना मी प्रतिक्रिया सुद्धा दिली. तोपर्यंत ते वादग्रस्त ट्विट डिलिट केलं गेलं होतं. म्हणून मी त्यावर काही बोललो नव्हतो. तरीही मी प्रतिक्रिया दिली.

शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच दिल्लीमध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंतीची दखल घेतली जात आहे.

संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यात देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं होतं. जवळपास ७० खासदार जमले होते. शाहू महाराजांवरील जयसिंगराव पवारांचे हजारो पुस्तके मी देशी विदेशी अतिमहत्वाच्या व्यक्तींना भेट म्हणून दिले आहेत. त्यातून महाराजांचा इतिहास पोचवण्यास मदतच होत आहे.

महाराष्ट्रात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन उभं केलं. ते राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जे जे केलं. त्या गोष्टींमधून आदर्श घेऊन मी कार्य करत असतो. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मी त्याच उद्देशाने उतरलो होतो. आजही आहे. कोल्हापुरातील महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या करत असताना मी स्वतःचा विचार करत नाही. कारण, त्यावेळी माझ्यासाठी देशहित , समाजहित महत्वाचे असते.

सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून, राजर्षींपर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे.

संभाजी छत्रपती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 12:23 pm

Web Title: devendra fadnavis should apologize to people of maharashtra bmh 90
Next Stories
1 “छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही!”
2 Coronavirus : औरंगाबादेत आणखी 17 नवे रुग्ण, एकूण संख्या 373 वर
3 “फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला ट्रोल करतोय म्हणून कार्यकर्ते निवेदन सादर करायला जातील”
Just Now!
X