13 July 2020

News Flash

रा. स्व. संघाचे देवगिरी महासंगम

व्हाटस्अॅप, फेसबुक आणि दूरसंपर्काचे प्रचंड जाळे असताना पोळी हे संपर्काचे माध्यम असू शकते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरिणांना हेच माध्यम अत्यंत प्रभावी वाटते. म्हणूनच देवगिरी महासंगमनिमित्ताने

| January 6, 2015 01:30 am

व्हाटस्अॅप, फेसबुक आणि दूरसंपर्काचे प्रचंड जाळे असताना पोळी हे संपर्काचे माध्यम असू शकते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुरिणांना हेच माध्यम अत्यंत प्रभावी वाटते. म्हणूनच देवगिरी महासंगमनिमित्ताने औरंगाबाद शहरातून दीड लाख पोळ्या गोळा केल्या जाणार आहेत. येत्या ११ जानेवारीला होणाऱ्या या संमेलनासाठी ५५ हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली आहे. अन्य माध्यमातून एकच व्यक्ती जोडली जाते. घरातून पोळ्या आणल्या की, अख्खे कुटुंबच आपलेसे होते. या वेळी नव्या १५ हजार घरांतून पोळ्या आणल्या जाणार आहेत. या साठी ३४० पोळी संकलन केंद्रे उघडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे शहरातील दलित वस्त्यांमध्येही पोळी संकलन केंद्रे आहेत.
पोळ्यांच्या संपर्काविषयी रा. स्व. संघाचे देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे सांगत होते, ‘‘अनेक घरांमधून पोळी आणणे हे म्हटले तर सोपे, म्हटले तर अवघड काम. त्या घरातल्या महिलेला पोळ्या करून द्यायच्या आहेत, असे कर्ता पुरुष सांगतो तेव्हा कार्यक्रमाविषयीची तिची उत्सुकताही ताणली जाते. आपल्यामुळे कार्यक्रम चांगला होतो आहे, या भावनेतून पोळ्या दिल्या जातात. ही मानसिकता घडविण्यासाठी म्हणून स्वयंसेवकाला घरापर्यंत जावे लागते. तो त्याचा पहिला संपर्क असतो. तयार झालेल्या पोळ्या आणण्यासाठी तो दुसऱ्यांदा जातो आणि कार्यक्रम चांगला झाला, त्यात तुमचाही सहभाग होता हे सांगण्यासाठी तिसऱ्यांदा जातो. या ३ भेटींमध्ये ते कुटुंबच त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात येते.’’
माध्यमांमध्ये प्रचंड वेगाने बदल झाले असतानाही पोळी हेच संपर्काचे प्रभावी साधन मानून रा. स्व. संघाचे काम सुरू आहे. शहरातील दलित वस्त्यांमध्येही पोळी संकलन केंद्र उघडण्यात आले आहे. इंदिरानगर, मिलिंदनगर, एकनाथनगर, एन ७ व आंबेडकरनगर अशा अनेक ठिकाणांतून देवगिरी महासंगममध्ये येणाऱ्या स्वयंसेवकांना जेवणात पोळ्या दिल्या जातील.
गणवेश खरेदीत वाढ
तुम्हीही घातली का खाकी चड्डी, असा हिणवण्याचा सूर अलीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ऐकायला लागला होता. सामाजिक संकेतस्थळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संघाची चड्डी घातलेली अनेक छायाचित्रे तयार करून एकमेकांना पाठविली जात होती. तेव्हा राजकीय पातळीवर होणारी चड्डीची चर्चा लक्षात न घेता तरुणांनी मात्र गणवेश खरेदीवर जोर दिला आहे. नोंदणी केलेल्या ५५ हजार स्वयंसेवकांपैकी सुमारे २३ हजार स्वयंसेवकांनी गणवेशाची खरेदी केली. पांढरा शर्ट ज्याच्या त्याच्या घरी असतो. त्यामुळे खाकी चड्डी, पट्टा, टोपी यांची मागणी एवढी वाढली की, इंदूर व सोलापूरवरूनही गणवेशासाठीची चड्डी मागवावी लागली. या चड्डीच्या दरांचे गणितही मोठे गमतीचे आहे. कमरेचे माप गुणेले चार रुपये असे त्याचे सूत्र. टोपी २० रुपयांची आणि पट्टा ६० रुपयांचा. गणवेशात बूट-मोजे नसतील तर चालतील, अशी सूचना देण्यात आली आहे. झालेल्या नोंदणीत तरुणांची संख्या कमालीची आहे. त्यामुळे संघात ‘अच्छे दिन’ची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2015 1:30 am

Web Title: devgiri mahasangam of rss
टॅग Aurangabad,Rss
Next Stories
1 अशोकरावांचे माणिकरावांना खडे बोल
2 स्वातंत्र्यानंतर मराठवाडय़ाला फक्त १६ किलोमीटरचे रुळ
3 संगमनेर पालिकेत बिबटय़ांची ‘सभा’
Just Now!
X