मालेगांव शहरातील करोना रुग्ण उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आणण्यास येथील सर्वपक्षीय राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनीही एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मालेगांवातील रूग्ण धुळ्यात आणल्यास व्यवस्था कोलमडण्याची भीती त्यांनी रुग्णालयाच्या तांत्रिक समितीसमोर व्यक्त केली.

धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालयात मुख्य कोविड-१९ कक्ष कार्यान्वित आहे. रुग्णालयातील डॉक्टरही करोनामुळे बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण कर्मचारी तणावात काम करीत आहेत. अशा परिस्थितीत मालेगावातील रुग्ण धुळ्यात हलविण्यास विरोध करण्यात आला आहे. दुपारी सर्व निवासी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, स्वच्छता कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने केली. महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीसमोर या आंदोलक डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे यांनी आंदोलक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. शेजवळ हेही उपस्थित होते. प्रशासन आणि राज्य शासनाला आपली भूमिका आम्ही कळवू. रूग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, साधन-सुविधांची कमतरता याबद्दलही सांगू. सर्वोपचार रुग्णालयावर भार टाकण्यापेक्षा इतर व्यवस्था कशी करता येईल, याबद्दल शासनाने निर्णय घ्यावेत, अशी भूमिका मांडली जाईल असे  डॉ. रामराजे यांनी सांगितले.

डॉक्टर, परिचारिका यांना पाठिंबा देत मिल परिसर आणि मोहाडी येथील भाजपचे नगरसेवक सारिका अग्रवाल, सुरेखा उगले, सुरेखा देवरे, वंदना मराठे, शितल नवले, राजेश पवार, अमोल मासुळे, दगडू बागूल यांसह भाजप मंडल अध्यक्ष प्रविण अग्रवाल, राजु महाराज तसेच परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वोपचार रूग्णालय मिल आणि मोहाडी परिसरात आहे. दाट लोकवस्ती असलेले हे दोघे भाग अद्याप करोनामुक्त आहेत. त्यामुळेच मालेगावचे रूग्ण येथील रूग्णालयात आणल्यास मिल आणि मोहाडी परिसरातील जनता विरोधात रस्त्यावर येईल, असा इशारा याप्रसंगी नगरसेविकांनी प्रशासनाला दिला.

सर्वपक्षीयांचा इशारा

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शिवसैनिक मालेगावकडून येणाऱ्या रस्त्यांवर पहारा देवून येणारी रुग्ण वाहिका रोखून परत पाठवतील, असा इशारा दिला. यावेळी महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, धिरज पाटील आदी उपस्थित होते. भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपुरचे आमदार काशीराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. खासदार भामरे यांनी मालेगांवच्या जनतेचा करोनाचे अजिबात गांभीर्य नसल्याचा आरोप केला. जनता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. मालेगांवात सीआरपीएफ आणि लष्कराला बोलवावे, अशी मागणीही त्यांनी केली. मराठा क्रांची मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, संजय वाल्हे, अर्जुन पाटील, नाना कदम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनीही निवेदनाव्दारे मालेगावचे रूग्ण धुळ्यात आणण्यास विरोध केला आहे.

अद्याप निर्णय नाही

धुळ्यात मालेगावचे रुग्ण आणण्याचा निर्णय अजून झालेला नाही. मालेगावसारखी आपत्ती झेलण्यासाठी आजच्या घडीला धुळे तितके सक्षम नाही. आपली वैद्यकीय यंत्रणा इतकी बळकट नाही. ती आपण आता बळकट करत आहोत. ही माहिती मी प्रशासनाला कळविली आहे. मालेगावच्या रुग्णांबाबत शासनाकडून जो निर्णय घेतला जाईल. त्याआधी आमच्याशी चर्चा होईल. अद्याप अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. माझ्यापर्यंत तसा प्रस्तावही आलेला नाही. तरीही लोकप्रतिनिधींच्या भावना मी शासनापर्यंत पोहोचवितो.

-संजय यादव (जिल्हाधिकारी, धुळे)