तिहेरी हत्याकांड. त्याला जातीचा कोन. त्यामुळे एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. अशा परिस्थितीत आरोपींवरील गुन्हा सिद्ध करणे हे कठीण काम होते. परंतु परिस्थितीजन्य पुरावे आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पोलिसांनी मोठय़ा कौशल्याने या हत्याकांडाचा तपास केला. त्यामुळेच आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही भीषण घटना १ जानेवारी २०१३ची. मुलगी मराठा जातीतील. तिच्यावर मेहतर (वाल्मीकी) समाजातील तरुणाचे, सचिन धारू याचे प्रेम. इतके की सचिनने आपल्या छातीवर नाव गोंदले होते त्या मुलीचे. तिच्याशी लग्न करायचे होते त्याला. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या, संदीप थनवर आणि सागर उर्फ तिलक राजू कंडारे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. कडबा कापण्याच्या अडकित्त्याने सचिनचे आणि कंडारेचे मुंडके, हातपाय कापून कूपनलिकेत, कोरडय़ा विहिरीत टाकण्यात आले. संदीपला स्वच्छतागृहाच्या मैल्यात बुडवून मारण्यात आले.

कंडारे आणि संदीपची हत्या करून सचिनने आत्महत्या केली असा बनाव आरोपींनी केला होता. पण सहायक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी पहिल्या २४ तासांतच या गुन्ह्य़ाचा अत्यंत कौशल्याने तपास केला. त्यांनी तिघांचेही मृतदेह शोधून काढले. गुन्ह्य़ात वापरण्यात आलेला अडकित्ता, कोयता जप्त केला. प्रमुख आरोपींना अटक केली. पुढे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला.

या आरोपींवर न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यामध्ये एक मोठी अडचण होती. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना या खटल्यात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळू शकला नव्हता. त्यामुळे खटला टिकेल की नाही, अशी भीती  होती.

येथे त्यांच्या साह्य़ाला आले आधुनिक तंत्रज्ञान. सचिनचे हातपाय तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या अडकित्त्याला त्याच्या गळ्यातील ताईत अडकला होता. तो सचिनची आई कलाबाई सोहनलाल धारू आणि दाजी हरिश्चंद्र आटवाल (रा. जळगाव) यांनी ओळखला. तो एक महत्त्वाचा पुरावा ठरला. शेतातील वांग्याच्या झाडावर रक्त उडाले होते. त्याचे नमुने घेण्यात आले. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत हे रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले. सचिन व त्याच्या आई कलाबाई सोहनलाल धारू यांचा डीएनए सारखाच असल्याचे आणि त्यामुळे तो मृतदेह सचिनचा असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइलमुळे तपासाला दिशा

सचिन धारूसह तिघांना त्यांच्या मोबाइलवर नववर्षांच्या शुभेच्छांचे संदेश आले होते. आरोपींनी हत्येपूर्वी मोबाइलवरून एकमेकांशी संभाषण केले होते. ते कोणत्या मोबाइल टॉवरवरून गेले हे तपासात उपयोगी ठरले.

सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दीड हजाराहून अधिक मोबाइलवरील दूरध्वनींची, लोकांची चौकशी केली. त्यातून काही आरोपी शोधण्यासही मदत झाली. घटनास्थळी आरोपींचे वास्तव्य असल्याचे न्यायालयात त्यामुळे सिद्ध झाले.

प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचे नाकारले जात होते. पण त्या मुलीने सचिनला केलेले मोबाइल संदेश महत्त्वाचे ठरले. तिने न्यायालयात काहीच सांगितले नाही. ती फितूर झाली. पण तिने पाठवलेल्या संदेशांमुळे हत्येच्या कारणावर प्रकाश पडून खटल्यात त्याला पुरावा म्हणून ग्राहय़ धरण्यात आले. एकंदर या खटल्यात डीएनए आणि मोबाइल हेच खरे साक्षीदार ठरले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dna mobile witnesses in sonai honour killing case
First published on: 21-01-2018 at 03:20 IST