मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनात त्यांच्या खास आक्रमक शैलीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशींना देशातून हाकला हे आवाहनही केंद्र सरकारला केलं. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी NRC, CAA ला आपला पाठिंबाही दर्शवला आहे. त्यांनी गुरुवारी केलेलं भाषण आणि पक्षाचा बदलेला झेंडा या दोन्ही गोष्टी सूचक आहेत. मनसे या पक्षाची भूमिका सेक्युलर होती मात्र आता हा पक्ष हिंदुत्वाकडे वाटचाल करतो आहे हेच गुरुवारच्या अधिवेशनाने दाखवून दिलं. आपण पाहुयात त्यांच्या भाषणातले १० ठळक मुद्दे
राज ठाकरेंच्या भाषणातले १० ठळक मुद्दे
१) जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी भाषणाची सुरुवात करत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यांच्या भाषणाची सुरुवात ऐकून महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. कारण बाळासाहेब ठाकरे हेदेखील त्यांच्या भाषणाची सुरुवात याच वाक्याने करत
२) समझौता एक्स्प्रेस बंद करा अशीही भूमिका राज ठाकरेंनी घेतली. NRC, CAA यावरुन होणाऱ्या गोष्टी होत राहतील आधी समझौता एक्स्प्रेस बंद करा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
३) ९ फेब्रुवारीला CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मनसे मोर्चा काढणार आहे हेदेखील राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जाहीर केलं.
४) बांगलादेशी, पाकिस्तानी मुसलमानांना देशातून हाकलून द्या, त्यांना हाकलून देण्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे असंही राज ठाकरेंनी जाहीर केलं.
५) मनसेने झेंडा का बदलला याचं कारणही राज ठाकरेंनी विशद केलं. इतकंच नाही तर निवडणूक प्रचारासाठी शिवमुद्रा असलेला झेंडा घ्यायचा नाही असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं. झेंडा बदलण्याचा विचार वर्षभरापासून होता तो अधिवेशनाच्या दिवशी अंमलात आणला असंही राज यांनी स्पष्ट केलं.
६) मशिदींवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत अशीही रोखठोक भूमिका राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात पुन्हा एकदा घेतली. आमची आरती त्रास देत नाही तर तुमचा नमाजही त्रास देणारा नको असंही राज यांनी म्हटलंय
७) सोशल मीडियावर पक्षाबाबत काही आक्षेपार्ह लिहिलंत तर पदावरुन हकालपट्टी करेन, एकाच वयाचे दोन पदाधिकारी असतील तरीही जो उच्च पदावर आहे त्याच्या पदाचा मानल राखला गेलाच पाहिजे असंही राज ठाकरेंनी जाहीर केलं
८) मी रंग बदलून सत्तेत जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला
९) मी हिंदूच आहे मी धर्मांतर केलेलं नाही. जर धर्माच्या विरोधात आलात तर हिंदू म्हणून आणि मराठीच्या आड आलात तर मराठी म्हणून तुमचा सामना करेन असंही राज ठाकरेंनी जाहीर केलं
१०) देशभक्त मुसलमानांना कधीही नाकारणार नाही. असं म्हणत राज ठाकरे यांनी ए.पी.जे. अब्दुल कलाम, झहीर खान यांना कधीही नाकारणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
तर एकंदरीत राज ठाकरे यांनी एक आक्रमक भाषण करुन आपण हिंदुत्वाच्या वाटेवर चाललो आहोत हा संदेश दिला आहे. आता भविष्यात ते भाजपासोबत जाण्याची भूमिका घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.