News Flash

डॉक्टर्स डे स्पेशल : आधी करोनाबाधितांची सेवा, मग कौटुंबिक जबाबदारी

अतिशय कठीण परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलणाऱ्या अलिबागच्या डॉक्टर अपुर्वा कुलकर्णी.

एक वर्षाच्या मुलासह कौटुंबिक जबाबदारी असूनही, करोनाबाधितांची अविरत सेवा करण्याचे काम अलिबागच्या डॉ. अपुर्वा कुलकर्णी करत आहेत. करोना महामारीच्या अतिशय कठीण परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य त्या यशस्वी रित्या पेलत आहेत. त्यांचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपुरता मर्यादीत असलेल्या करोनाचा आता रायगड जिल्ह्यातही मोठा प्रमाणात शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरचा कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत रुग्ण सेवा देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. मात्र अशा परिस्थितीत न डगमगता रुग्ण सेवा देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून पार पाडत आहेत. अलिबागच्या डॉ. अपुर्वा कुलकर्णी त्यांपैकीच एक आहेत.

मुळच्या अलिबागच्या असलेल्या व शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही तिथेच घेतलेल्या डॉ. अपुर्वा यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून पदवी आणि पदवीत्तर वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले. यानंतर मेळघाट सारख्या आदिवासी भागात त्यांनी काही काळ वैद्यकीय सेवा दिली. काही काळ कोल्हापूर येथेही काम केले. यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात फिजीशिअन म्हणून त्या रुजू झाल्या. जिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित तसेच इतर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी त्या समर्थपणे पेलत आहेत.

जिल्ह्यात करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात करोना अलगीकरण कक्ष आणि जिजामाता रुग्णालयात कोव्हीड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली. यातील रुग्णांना उपचार देण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयांतील डॉक्टरांवर सोपविण्यात आली आहे. रुग्णालयातील तीन फिजीशियन दोन्ही कक्षांची रुग्णसेवेची जबाबदारी संभाळत आहेत. यात डॉ. अपुर्वा यांचा समावेश आहे. महत्वाचीबाब आपल्या एक वर्षाच्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्या करोना बाधितांवर अविरतपणे उपचार करत आहेत.

दैनंदिन रुग्ण सेवा आणि करोना रुग्णांची सेवा यात खूपच फरक असल्याचे त्या सांगतात. दररोज नव्या आव्हानांना डॉक्टर आणि परिचारीकांना, क्ष किरण तंत्रज्ञ आणि कक्षातील इतर कर्मचाऱ्यांना सामोरं जावे लागते. यात रुग्णांच्या आजाराची लक्षणे अचानक गंभीर होत जातात. त्यामुळे त्याला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करणे, गरज भासल्यास त्याला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवणे गरजेचे असते. याचा प्रचंड ताण अलगीकरण कक्षातींल  सर्वांवर असतो. पण परिस्थितीपुढे न डगमगता रुग्ण सेवा करण्याचे काम सर्वजण करत असतात, असे डॉ. अपुर्वा सांगतात. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद गवई आणि डॉ. पाडाळे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आमचा आत्मविश्वास वाढवत असतात. त्यामुळे काम करण्याची उमेद मिळते असंही त्या आवर्जुन सांगतात.

जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले आहेत. सर्दी खोकला तापाची लक्षणे असणारे रुग्ण तपासणार नाही असही सांगीतले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या मातृत्वाची जबाबदारी बाजूला ठेऊन, करोना बाधितांच्या सेवा करणाचे डॉ. अपुर्वा यांचे कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरते.

घरच्यांचा भक्कम पाठींबा असल्याने काम करणे अधिक सोपे –

करोना विरोधातील या लढाईत आपल्याचा घरच्यांचा भक्कम पाठींबा आहे. त्यामुळे काम करणे अधिक सोप झाले आहे. घरच्या कामात पती, सासू, सासरे यांची मदत होतेच. पण माझ्या एक वर्षाच्या मुलाच्या संगोपनात त्यांचे मोठंच सहकार्य असते. त्यामुळेच वैद्यकीय सेवेचे काम अधिक मोकळेपणाने करता येते

-डॉ. अपुर्वा कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 9:24 am

Web Title: doctor day special first the service to the corona patients then family responsibilities msr 87
टॅग : Coronavirus,Doctor
Next Stories
1 “तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे”
2 आज नाहीतर उद्या प्रत्येकाला जायचंच आहे, करोनाला घाबरू नका : उदयनराजे भोसले
3 करोनाचे संकट नष्ट होवो यासाठी मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडं
Just Now!
X