मध्यरात्री झोपेत असलेल्या गावकऱ्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याने चढविलेल्या हल्ल्यात १९ जण जखमी झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील टाकळी गावात घडली. या कुत्र्याने अनेकांना चावे घेऊन रक्तबंबाळ केले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. शासकीय रुग्णालयात आलेल्या जखमींसाठी ‘अ‍ॅन्टी रेबीज्’ लस शिल्लक नसल्याने नातेवाईकांना त्या बाहेरून विकत घ्याव्या लागल्या.

टाकळी गावात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. सखवारबाई मगर (७०) या वृद्धेच्या चेहऱ्याचे लचके तोडले. गोरख सूर्यवंशी, रत्नाबाई पाटील, पुला पवार निंबा पवार, भागाबाई पाटील, नामदेव निकम, दशरथ नाईक, सुशीलाबाई मगर यांच्यासह १९ जण त्यात जखमी झाले.
पहाटे जखमींच्या नातेवाईकांनी धुळे जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात अ‍ॅन्टी रेबीज्च्या लस तसेच आवश्यक ती औषधे शिल्लक नसल्याने जखमींना केवळ मलमपट्टी करून बसवून ठेवण्यात आले.