ग्रामीण भागातील तंटे मिटवून नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत, या प्रमुख उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेवर दुष्काळाचा विपरीत परिणाम झाला आहे. तंटय़ांची संख्या कमी होण्याऐवजी या काळात त्यात वाढ झाल्याचे अधोरेखित होत आहे. पाण्यावरून गावा-गावांत वाद-विवाद होत असून त्यांची सोडवणूक करता करता पोलीस यंत्रणेची दमछाक होत आहे.
तंटामुक्त गावमोहिमेचे २०१२-१३ हे सहावे वर्ष पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक पातळीवरील मतभेद वा असे वाद मिटवून विकासाला चालना देण्याकरिता शासनाने या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नये म्हणून उपक्रम राबविणे, दाखल असणारे व नव्याने निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे निराकरण करून ते कमी करणे ही या मोहिमेची प्रमुख वैशिष्टय़े. गावपातळीवर तंटे मिटविण्याच्या कामात सक्रिय राहणाऱ्या तंटामुक्त गाव समिती, पोलीस व जिल्हा प्रशासनासमोर दुष्काळाने वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक हा तसा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागातील धरणांचे पाणी मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद आदी भागात दिले जाते. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे नाशिकमधील धरणांचे पाणी सोडावे म्हणून उन्हाळ्याच्या प्रारंभीच सुरू झालेल्या आंदोलनांनी पुढे वेगळेच स्वरूप धारण केले. धरणांमधील पाणी सोडू नये म्हणून विरोध करणारा एक घटक आणि पाणी मिळावे, याकरिता आग्रह धरणाचा दुसरा घटक असे चित्र निर्माण झाले. याच कारणास्तव नाशिक, नगर व औरंगाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये कलह निर्माण झाला. औरंगाबादेतील वैजापूरच्या शेतकऱ्यांनी थेट नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यावर धडक देत दरवाजे तोडून एक्स्प्रेस कॅनॉलमध्ये पाणी सोडले. इगतपुरी तालुक्यात दारणा धरणातून पाणी सोडतानाही स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना पाटबंधारे विभागाला करावा लागला.
दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या मनमाडला सोडलेल्या आवर्तनावेळी पाणीचोरीचे प्रकार घडले. निफाड तालुक्यात झालेल्या पाण्याच्या चोरीवरून मनमाडकर व निफाडकरांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली. याच स्वरूपाचा वाद धुळे जिल्ह्यातही घडला. धुळ्याला पाणी देण्यास साक्री तालुक्याने विरोध दर्शविला होता. तेव्हा जिल्हा प्रशासनास पोलिसांच्या मदतीने हस्तक्षेप करणे भाग पडले. दुष्काळामुळे उत्तर महाराष्ट्रात गावा-गावांमध्ये असे अनेक वाद घडले. कोणी पाणी मिळावे म्हणून मैदानात उतरले तर कोणी पाणी देण्यास विरोध करण्यासाठी. पाण्यावरून चाललेल्या संघर्षांमुळे तंटामुक्त गावमोहिमेच्या मूळ उद्देशाला तडा गेल्याचे दिसत आहे.