पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाची वाटचाल मृतावस्थेकडे सुरु आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. देशात विरोधाक विस्कटलेले आहेत त्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पंढरपुरातल्या सहकार क्षेत्रातील माजी आमदार सुधाकर परिचारक, राजूबापू पाटील, रामदास महाराज कैकाडी, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन झाले आहे. या सगळ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे पंढरपुरात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. सामाजिक शांतता राहिली नाही.महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा या परिस्थितीत बेबंदशाही वाढू शकते अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. तसेच प्रवक्ता आंबडेकर यांच्या विषयी त्यांनी बोलणे टाळले.

देशात हाथरससारखी एक नाही अनेक प्रकरणं घडली आहेत. येथे सामाजिक विचार खाली गेला आहे. गरीब माणसाला येथं जगणं मुश्किल झालं आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली आहे त्यामुळे नव्या सुशिक्षित तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सोशल मीडियातून काही बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला आहे असंही त्यांनी सांगितलं तसंच सोशल मीडियाचा वापर विचार करुन केला गेला पाहिजे असाही सल्ला त्यांनी दिला.