राष्ट्रीय महामार्गावर उडे धूळमाती..

लोकसत्ता वार्ताहर

वसई : मालजीपाडा येथील लोढाधाम परिसरात माती पडून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पसरत आहे. यामुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हवेतील वाढत्या धुलिकणांमुळे या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गानजीक लोढाधाम भागात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य होते. सध्या परतीच्या पावसाचा अधूनमधून शिडकावावगळता उन्हामुळे चिखल वाळून मार्गावर पसरलेल्या चिखलाचे धुळीत रूपांतर झाले आहे. ही धूळ वाऱ्यासरशी या परिसरात पसरत आहे. हवेत धुळीचे प्रमाण अधिक असल्याने काहीवेळा वाहनचालकांना समोरची वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी  वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी महामार्गावर पडणाऱ्या मातीचे प्रमाण वाढू लागले आहे. मातीची वाहतूक करताना माती रस्त्यावर पडणार नाही याची खबरदारी वाहनचालकांनी घेणे गरजेचे आहे. असे न केल्याने ही माती अधिक प्रमाणात पसरू लागली आहे. याचा फटका येथून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांना बसू लागला आहे. यासाठी महामार्ग स्वच्छ  करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका

राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणच्या भागात विकासकामे सुरू झाली आहेत. परंतु यासाठी लागणारी माती व इतर साहित्याची वाहतूक सुरू असते. ही वाहतूक करताना अनेक वाहनचालक  हे विरुद्ध दिशेने येऊन वाहतूक करतात.आधीच धुळीच्या कचाटय़ातून वाट काढत वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. त्यातच विरुद्ध दिशेने येणारे वाहन जर नजरेस पडले नाही तर अपघात होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे..