हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : रायगड जिल्हा पुरवठा विभागाने शिधापत्रिका नसलेल्या आणि विस्थापित कुटुंबांना धान्य पुरवठय़ासाठी ईझी फॉम्र्स नामक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. धान्य वितरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी हा यामागचा मूळ उद्देश आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील इतर जिल्ह्यातही याच मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची वापर केला जाणार आहे.

टाळेबंदीमुळे राज्यातील विविध भागात अडकून पडलेल्या, आणि शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू कुटुंबांना प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे धान्य वितरण करताना त्याची योग्य नोंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा पुरवठा विभागाने शिधा पत्रिका नसलेल्या कुटुंबांना धान्य वितरणासाठी नवीन मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. पुण्यातील एका कंपनीच्या मदतीने ईझी फॉम्र्स नामक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.

रायगड जिल्ह्यात ९६५ मेट्रीक्ट टन धान्य वितरणासाठी उपलब्ध झाले आहे. हे धान्य १ लाख ८५ हजार कुटुंबांना वितरीत केले जाणार आहे. या धान्य वितरणात पारदर्शकता यावी यासाठी या मोबाईल अ‍ॅपचा वापर सुरु करण्यात आला आहे. २२ मेपासून जिल्ह्यातील सर्व रास्त धान्य दुकानात ही ईझी फॉम्र्स प्रणाली कार्यान्वयित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार दिवसांत ५५२ कुटुंबांनी या धान्य वितरणाचा लाभही घेतला आहे.  या आधुनिक प्रणालीची परिणामकारकता लक्षात घेऊ न राज्यातील इतर जिल्ह्यातही हेच मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास अठरा जिल्ह्यात ही प्रणाली कार्यान्वयित करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.

‘शिधा पत्रिका नसलेल्या गरजू कुटुंबांना धान्य वितरण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या धान्य वितरणात पारदर्शकता यावी यासाठी इझी फॉम्र्स मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करून घेतले आहे. जिल्ह्यात त्याचा वापरही सुरू झाला आहे. गरजेनुसार त्यात बदल करण्याची तयारी ठेवली आहे. आता इतर जिल्ह्यातही हेच मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे.’

    –  मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड