22 February 2020

News Flash

पर्यावरणस्नेही मखरांना यंदा अधिक पसंती

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन आता अवघ्या दहा दिवसांवर आले आहे.

कापड, पुठ्ठय़ापासून कलात्मकतेने तयार केलेले मखर बाजारात

रमेश पाटील, वाडा

गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे, या उत्सवासाठी सर्वात मोठी तयारी म्हणजे सजावट, झगमगाट. या सजावटीमध्ये सर्वात जास्त श्री गणेशमूर्तीसाठी असलेल्या मखरला अधिक महत्त्व दिले जाते. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता ते अबाधित राहावे यासाठी पर्यावरणस्नेही मखरांना ग्राहकांनी पहिली पसंती दिली आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचे आगमन आता अवघ्या दहा दिवसांवर आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीसाठी बाजारपेठा सजलेल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासह आता अनेक कुटुंबांच्या घरांमध्येही गणपतीचे आगमन होत आहे. ही कुटुंबे सजावटीला अधिक महत्त्व देतात. या सजावटीमध्ये मखर कसे असावे, ते थर्माकोलचे असावे की पुठ्ठय़ाचे, कापडाचे असावे यावर कुटुंबात बरेच मंथन केले जाते. मात्र सद्य:स्थितीत पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यासाठी कापडी मखरांनाच चांगली मागणी दिसून येत आहे. प्लास्टिक वापराच्या बंदीबरोबर थर्माकोलवरही बंदी आल्याने मखर बनविणाऱ्या कलाकारांनी पुठ्ठा व कापड यापासून बनविलेले पर्यावरणस्नेही मखर बाजारात आणले आहेत.

वाडा शहरात एका दहावी शिकलेल्या राहुल पटारे या तरुणाने  विविध रंगीबेरंगी, डिझाइनच्या चांगल्या कपडय़ांपासून वेगवेगळ्या डिझाइनमध्ये बनविलेल्या मखरांकडे ग्राहक आकर्षित होताना दिसत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून या व्यवसायात असलेला राहुल पटारे ग्राहकांची पर्यावरणस्नेही मखरांची मागणी पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे. थर्माकोल मखर बनविण्यापेक्षा कापडी मखर बनविण्यासाठी मेहनत जास्त लागते.

वाडा तालुक्यातील कळंभे या खेडेगावातून आलेल्या या तरुणाने गणेशभक्तांनी पर्यावरणाची काळजी घ्यावी यासाठी खास वाडा शहरात पर्यावरणस्नेही मखर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

गतवर्षी अवघे ३५ पर्यावरणस्नेही मखर राहुलने बनविले होते. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या वर्षी आतापर्यंत शंभरहून अधिक मखर त्यांनी तयार करून ठेवले आहेत. आठशे रुपयांपासून ते सात हजार रुपये किंमत असलेले विविध कलाकुसरीतील व आकारातील कापडी मखर सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.

वजनाला हलके, धुण्यायोग्य

संपूर्ण कापडाचा वापर, कापडी फुलांची सजावट (आर्टिफिशियल) केलेले हे मखर वेगवेगळ्या भागांचे (फोल्िंडग) आहेत. वजनाला हलके, वाहतुकीस सुकर व संपूर्ण कपडा धुण्यायोग्य (वॉशेबल) असल्याने या मखराचा वारंवार उपयोग करता येणार आहे. अवघे दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राहुलने कुठल्याही प्रकारचे कलेचेही शिक्षण घेतलेले नाही. तल्लख बुद्धी व प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने एकटय़ाने हा व्यवसाय सुरू केला असून तो या व्यवसायात यशस्वी झाला आहे.

कापड, कापडी फुले व चांगल्या दर्जाचा प्लास्टिक पाइप वापरून बनविलेले हे मखर धुण्यायोग्य असल्याने त्याचा वारंवार वापर करता येणार आहे.

– राहुल दत्तात्रेय पटारे, वाडा

First Published on August 21, 2019 4:18 am

Web Title: eco friendly makhar is more preferred this time for ganpati festival zws 70
Next Stories
1 लालबागच्या राजाला १७ लाखांचे आगाऊ बिल
2 बेकायदा मंडपांचे पेव
3 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात