12 August 2020

News Flash

निवडणुका आणि जुगार बनावट नोटांचे ग्राहक

निवडणुकांसाठी छुप्या पद्धतीने वाटले जाणारे पैसे आणि जुगारासारख्या धंद्यातून बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

| July 12, 2015 02:20 am

निवडणुकांसाठी छुप्या पद्धतीने वाटले जाणारे पैसे आणि जुगारासारख्या धंद्यातून बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे. सांगली, कोल्हापूर येथे काल रात्री मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून ही माहिती पुढे आली आहे. सांगलीत सापडलेल्या ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटाही या निवडणुकांसाठीच वापरल्या जाणार होत्या.
सांगलीत कालच्या कारवाईत या गुन्ह्य़ातील एक मोठी साखळीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांकडून वरील धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या नोटा तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा जसा प्रसार होत आहे तसाच या नोटा वितरित करण्याची पद्धतीही या गुन्हेगारांनी विकसित केली आहे. या नोटांचे वितरण हे गैरधंद्यातून तसेच छुप्या पद्धतीने चालणाऱ्या व्यवहारामधून करणे अधिक सोपे असल्याने गुन्हेगार अशा मार्गाकडे वळले आहेत. यामध्ये सर्वात जवळचा मार्ग म्हणून त्यांनी निवडणूक आणि जुगाराला प्राध्यान्य दिले आहे.
सांगलीत सापडलेल्या ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा या जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वाटल्या जाणार होत्या. हे असे पैसे एकतर छुप्या पद्धतीने वाटले जातात. तसेच या पैशांचे सुटय़ा प्रमाणात वितरण होत असल्याने हा बनावट पैसा व्यवहारात आणणे सोपे जात आहे. हा सर्वच प्रकार बंद दरवाज्याआड सुरू असल्याने अशी नोट दिल्याबद्दल लोकही तक्रार करण्याऐवजी ती नोट व्यवहारात आणण्याचाच प्रयत्न करतात. याशिवाय जुगारासारख्या धंद्यामधूनही या नोटा वितरित होत असल्याचे या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून पुढे आले आहे.
दरम्यान कालच्या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ जुलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रमेश घोरपडे, सुभाष शिवगेंडा पाटील, ऐनुद्दीन ढालाईत आणि इम्रान ढालाईत अशी या चौघांची नावे आहेत. या प्रकरणी अन्य दोघे फरारी झाले आहेत.
या कारवाईत काल ३५ लाखांच्या बनावट नोटांबरोबरच दत्तवाड गावात या नोटा तयार करणारा एक कारखानाच उघड झाला आहे. पोलिसांना इथे छपाई यंत्र, कटर, स्कॅनर, व झेरॉक्स मशिनसह नोटांसाठी वापरण्यात येत असलेल्या कागदाचा मोठा साठा मिळाला आहे.
या सर्व आरोपींना झटपट श्रीमंती हवी होती. यासाठी त्यांनी या बनावट नोटा तयार करण्याची वाट निवडली. यातील रमेश व इम्रान हे नोटा छपाईचे काम करीत होते, तर वितरण करण्याचे काम ऐनुद्दीन ढालाईत करीत होता. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी केव्हापासून नकली नोटा तयार करण्यास प्रारंभ केला, त्याचे वितरण कसे झाले आणि बनावट नोटा घेणारे ग्राहक कोण याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू असून यामध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील काही राजकीय मंडळीही गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सीमेवरील गावाची निवड
बनावट नोटांचा कारखाना असलेले दत्तवाड हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने या बनावट नोटांचे धागेदोरे कर्नाटकातही असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारवाई टाळण्यासाठी तसेच या नोटांचे वितरण करण्यासाठी या सीमेवरील गावात हा कारखाना सुरू करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2015 2:20 am

Web Title: elections and gambling customer of fake notes
टॅग Elections,Sangli
Next Stories
1 उसाला ‘एफआरपी’ देण्यास खासगी साखर उद्योग असमर्थ
2 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी साडेसहा लाखांच्या निधीचे संकलन
3 ‘भ्रष्टाचारात बरबटलेल्या, गुन्हा दाखल असलेल्या लोकांकडून पाठीमागून वार’
Just Now!
X