परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनाबाबत सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या. पाणी असूनही शहरात वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. या बाबत काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्याने महापौर प्रताप देशमुख यांनी पाणीपुरवठा अभियंता किशोर संद्री यांच्या तत्काळ कार्यमुक्तीचे आदेश दिले, तसेच फेरफार विभागप्रमुख सुनील वसमतकर यांनाही निलंबित करण्यात आले. कामचुकार कर्मचारी, तसेच पाच-सहा वर्षांंपासून एकाच विभागात असणाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी, असेही सदस्यांनी सभागृहात सांगितले.
मनपा सभेत पाणीपुरवठा, स्वच्छता व शहरातील पथदिव्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, शिवसेनेचे गटनेते अतुल सरोदे यांच्यासह नगरसेवक शिवाजी भरोसे, अंबिका डहाळे, उदय देशमुख, वनमाला देशमुख यांनी तक्रारींचा पाढा वाचला. शहरात १०-१० दिवस पाणी येत नाही. जे घाण पाणी येते त्याबाबत कोणतीच कारवाई होत नाही. जलकुंभावर नियुक्त कर्मचारी दूरध्वनीही घेत नाहीत, आदी बाबी या नगरसेवकांनी सभेत मांडल्या. नगरसेविका अश्विनी वाकोडकर यांनी आपल्या प्रभागात पाणीपुरवठय़ाबाबत दोन झोन करण्याची मागणी केली. गुलमीर खान यांनी आपल्या प्रभागात नवीन जलवाहिनीचे कनेक्शन जोडले नाही, याकडे लक्ष वेधले. फेरफार, बांधकाम विभागात संचिका निकाली काढण्यासाठी ३-३ महिने लागतात, या बाबतही या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. नगरसेवक सुनील देशमुख यांनीही पाणीपुरवठय़ाबाबत नाराजी व्यक्त केली.
अखेर महापौर देशमुख यांनी पाणीपुरवठा अभियंत्यास कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले, तसेच फेरफार विभागप्रमुखांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी प्राप्त झालेले ५ कोटींचे अनुदान रस्त्यावर पथदिवे बसविणे, देखभालीसाठी वापरले जाणार आहे. शहरातील १५ मुख्य चौकांत हायमास्ट बसविण्यासाठी एक कोटी खर्च करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. शहरात नवीन ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता देण्याचा ठराव पारीत करण्यात आला.
प्राचार्य डांगे यांच्या नावे पुरस्कार
प्राचार्य रामदास डांगे यांच्या नावे मनपा साहित्य क्षेत्रातील कामगिरीबाबत ५० हजार रुपयांचा पुरस्कार दरवर्षी देणार आहे. त्यासाठी पाचजणांची समिती गठीत करण्यात येईल, असा ठराव सभेत घेण्यात आला. आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील, तर सदस्य म्हणून शिक्षण सभापतीसह अन्य मान्यवरांची नियुक्ती केली जाईल, असे या वेळी ठरले.
स्थायी समिती सदस्याची निवड
स्थायी समितीच्या आठ सदस्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते महापौर देशमुख यांनी मेहराज कुरेशी, रामराव गुजर, सुदामती थोरात, रेखा कानडे, काँग्रेस गटनेते भगवानराव वाघमारे यांनी संगीता दुधगावकर, वनमाला देशमुख, गणेश देशमुख व शारदाबाई मोरे यांची नावे नामनिर्देशीत केली. त्यानंतर नवनिर्वाचीत स्थायी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
अभियंता कार्यमुक्त, विभागप्रमुख निलंबित!
परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनाबाबत सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या. पाणी असूनही शहरात वेळेवर पाणीपुरवठा होत नाही.
First published on: 08-07-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Engineer work free head of department suspend