शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी दिवसभरात तब्बल २०० रुग्णांवर डोळ्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या पथकाने १८ ते २० तासात या शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने येथे १६ सप्टेंबर रोजी  अटल महाआरोग्य शिबीर झाले होते. शिबीरात डोळयांच्या विकारांनी त्रस्त ११ हजार ९८९ रूग्ण आले होते. त्यांची तपासणी केल्यावर एक हजार ८९८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असल्याचे स्पष्ट झाले. महाआरोग्य शिबीरात डॉ. लहाने, डॉ. रागिणी पारेख आणि इतर डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली होती. रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानुसार तपासणी केलेल्या एकूण रूग्णांपैकी ४१० जणांची पुनर्तपासणी केली. त्यानंतर रविवारी डॉ. लहाने, डॉ. पारेख यांच्या पथकाने १८ ते २० तासात २१० रुग्णांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांना एक ऑक्टोबर रोजी घरी जाऊ देण्यात येणार आहे. उर्वरीत दोनशे जणांवर सोमवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

सर्व रुग्णांची धुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भोजन आणि निवास व्यवस्थाही मोफत करण्यात आली. महाआरोग्य शिबीरात मधुमेह आणि उच्च रक्तदाब आढळून आलेल्या रूग्णांवर  मुंबई येथे उपचार करण्याचे नियोजन करण्यांत आल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, कार्यासन अधिकारी संदीप जाधव, डॉ.मुकर्रम खान, डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले.

धुळ्यात अटल महाआरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या ४०० रूग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहोत. त्यापैकी आज दोनशे रूग्णांवर डोळ्यांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सोमवारी पुन्हा दोनशे रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील. शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांची पुन्हा तपासणी करून त्यांना चष्मे देऊ. त्यांना चांगले दिसायला लागल्यानंतरच त्यांना सोडू.    -डॉ. तात्याराव लहाने (सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग)