News Flash

मराठवाडय़ात फळबागा वाचवण्यासाठी विहिरी भाडय़ाने!

आष्टी तालुक्यातील टाकळशिंग गावातील शेतकऱ्यांनी १८ एकर जमिनीत ५२ विंधनविहिरी घेतल्या.

दुष्काळामुळे मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे.

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

दुष्काळामुळे मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, काही शेतकऱ्यांनी तर लाखो रुपये मोजून भाडय़ाने विहिरी घेतल्या आहेत.

फळबाग अद्याप पूर्णत: वाळलेली नाही, अशा गावांतील शेतकरी परिसरातील पाणी टँकरने गोळा करत आहेत. विहिरी भाडय़ाने घेत आहेत. खणलेल्या विंधन विहिरीतून दोन-दोन दिवस पाणी साठवून ते १५ ते १८ किलोमीटरहून आणायचे आणि बाग जगवायची अशी बडय़ा शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. कोरडवाहू शेतकरी जनावरांना चारा आणि पाणी मिळविण्यासाठी चारा छावण्यांमध्ये मुक्कामी दाखल झाले आहेत. आष्टी तालुक्यातील टाकळशिंग गावातील शेतकऱ्यांनी १८ एकर जमिनीत ५२ विंधनविहिरी घेतल्या. त्यातील एक बोअर तब्बल १०३० फुटांवर आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील शेतकऱ्यांनी बाग वाचवण्यासाठी चार लाख रुपये भाडय़ाने विहीर घेतली आहे.

मराठवाडय़ात औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ांत मोसंबी आणि डाळिंबाचे क्षेत्र अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात वाढले होते. मात्र, २०१२ पासून सातत्याने पडणाऱ्या कमी पावसामुळे हळूहळू हे क्षेत्र घटू लागले. एका बाजूला ऊस वाढत असला, तरी फळबागांना लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात नसल्याने मोठय़ा शेतकऱ्यांनाही आता दुष्काळझळा जाणवू लागल्या आहेत. कोरडवाहू शेतकरी मिळालेल्या दुष्काळी अनुदानावर कसेबसे जगत आहेत. तर उन्हाळ्यात कृषीसाठी लागणाऱ्या पाण्याचा बाजारही तेजीत आहे. तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथे ६५ एकरात संजय त्र्यंबक फंड यांची शेती आहे. सगळ्या क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन हाच त्यांना एकमेव व्यवसाय आहे. वडील आणि दोन भाऊ याच कामात असतात. ते सांगत होते, आता परिसरातील गावांमध्ये फारसे पाणी शिल्लक राहिलेले नाही. सावरगाव, गंजेवाडी येथील ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे, त्या विहिरी काही महिन्यांसाठी आम्ही भाडय़ाने घेतो. आमची पाण्याची गरज भागविण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण बाग जगण्यावरच पुढचे सारे अवलंबून असते. त्यामुळे काही शेतकऱ्यांना एका विहिरीसाठी तीन लाख रुपये तर विंधन विहिरीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे भाडे आम्ही दिले आहे. शेतात चार शेततळी आहेत. अडीच कोटी लिटरची तीन शेततळी आणि साडेचार कोटी लिटरचे एक शेततळे भरून घेण्यासाठी संजय फंड यांनी टँकर लावले आहेत. ६०० रुपये टँकरच्या पाण्याचे, ड्रायव्हर आणि डिझेलचा खर्च वेगळा.

आष्टीपासून दहा किलोमीटर असणाऱ्या टाकळशिंग गावातील विश्वंभर जगताप यांच्याकडे १८ एकर शेती आहे. डाळिंब आणि लिंबाच्या बागा आहेत. सध्या टँकरने पाणी विकत घेत आहेत. येथेही तेवढाच भाव. कर्जत तालुक्यातील नागापूर येथून ते पाणी आणतात. त्यांनी ५२ बोअर घेतल्या. त्यातले आता आठ-दहा बोअर चालू आहेत. पण सगळ्या विहिरींचे मिळून १०-१२ हजार लिटरच पाणी उपलब्ध होते. मग बाहेरून पाणी आणावे लागते. २०१२ च्या दुष्काळात बोअर आटले म्हणून २०१९ पर्यंत त्यात आठ बोअरची भर टाकली. पण पाणी काही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे हिंगणी, नागलगाव आणि सांगवी या गावांतून ते पाणी आणतात. टँकरच्या रोज तीन-चार फेऱ्या होतात. बाग जगवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

अधिक खोलवर आणि दूरवर जाऊन ज्यांना पाणी आणता येते, त्यांच्या फळबागा वाचल्या आहेत. ज्यांना हा खर्च झेपत नाही, त्यांच्या बागा पूर्णत: सुकून गेल्या आहेत. एक बाग वाढवण्यासाठी किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो. आता मोठी आस घेऊन फळबाग जगवण्यासाठी कष्ट करणारा शेतकरी किमान आर्थिकदृष्टय़ा पाच वर्षे मागे ढकलला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 2:38 am

Web Title: farmers in marathwada taking well on rent to save horticulture
Next Stories
1 अनधिकृत शाळांच्या यादीची प्रतीक्षा
2 चाफा बाजारात पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
3 सलाम : बिबट्याच्या हल्ल्यातून आईनं केली बाळाची सुटका
Just Now!
X