कमी दरामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली, निर्यातही ठप्प

अशोक तुपे, श्रीरामपूर

दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन घटले. त्यात कमी दरात शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर स्थिर असले तरी ते निर्यातदारांना परवडत नाहीत. त्यामुळे हंगाम सुरू होऊनही कापसाची निर्यात ठप्प झाली आहे.

मागील वर्षी कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात घट आली. तीन कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. चालू वर्षी कमी पाऊस झाला. दुष्काळामुळे विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली. यंदा कापूस उत्पादनासंबंधी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार तीन कोटी १० लाख ते तीन कोटी ५० लाख गाठीचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

सध्या शिवारात कापसाची वेचणी सुरू आहे. उत्पादनात किती घट येईल, याचा नेमका अंदाज सध्या तरी नाही. मात्र सुमारे ६९ लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर स्थिर आहेत. बांगलादेशासह चीनमध्येही मागणी आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठीला ४६ हजार रुपये दर आहे. प्रत्येक गाठीमागे दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे एक गाठ ४८ हजार रुपयांना पडते. हे दर स्थिर आहेत. पण देशांतर्गत बाजारपेठेत चढय़ा भावाने कापूस खरेदी करून तो निर्यात करणे अडचणीचे आहे. त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. काही व्यापाऱ्यांनी निर्यातीचे सौदे केले होते. त्यामुळे हंगाम सुरू झाल्यानंतर १० लाख गाठीच निर्यात झाल्या. काही व्यापाऱ्यांनी आयातीचे सौदे केले होते. ते तोटा सहन करून पूर्ण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सध्या बाजारात पाच हजार ७०० ते पाच हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विकला जात आहे. राज्यात सुमारे ९०० जििनग मिल आहेत. हा दर परवडत नसल्याने अनेक मिल बंद आहेत. अवघ्या १० टक्के मिल सुरू आहेत. एका बाजूला कापसाचा तुटवडा, तर दुसऱ्या बाजूला चढे दर यामुळे अनेक जिनिंग मिल मालकांनी यंदा मिल बंद ठेवल्या आहेत. राज्यात केवळ ७० ते ८० जिनिंग मिल सुरू आहेत. मिलच्या खरेदीवर त्यामुळे मर्यादा आल्या आहेत. सध्या गुजरातचे मिल मालक कापसाची खरेदी करतात. गुजरातमध्ये आखूड धाग्याचा कापूस तयार होतो. या कापसात लांब धाग्याच्या कापसाची भेसळ करावी लागती. त्यामुळे त्यांनी चढय़ा दराने खरेदी सुरू केली आहे. कापसाची चोरटी निर्यात गुजरातला सुरू आहे. वस्तू व सेवा कर तसेच अन्य कर चुकविल्यामुळे त्यांना फायदा होतो. असे असले तरी सध्या शेतकरी कमी भावात कापूस विकायला तयार नाहीत. त्यामुळे व्यवहार थंडावले आहेत. काही मिलमालकांनी यावर उपाय शोधला असून करार पद्धतीने खरेदी चालविली आहे. मिलमालक शेतकऱ्यांशी करार करतात. त्यांना एक ते तीन महिन्यांपर्यंत जो दर असेल त्यानुसार पैसे देण्याचे करारात नमूद केले जाते. हा कापूस उधारीवर नेला जातो. तीन महिन्यांत दर कमी झाले, तरी पाच हजार ७०० रुपये दर देण्याचे करारात नमूद केले जाते. प्रथमच शेतकऱ्यांचा कापूस कराराने विकत घेऊन तेजीमंदीचा लाभ देऊन काही मालक आपल्या जिनिंग मिल चालवीत आहेत. अशा पद्धतीचे करार नगर, औरंगाबाद आणि खान्देशच्या काही भागांत सुरू आहेत. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे.

चालू हंगामात कापसाची काढणी सुरू झाली असून कापसाची गुणवत्ता चांगली आहे. पूर्वी कापसाचा दर्जा विक्रेते ठरवीत असत. आता मात्र अत्याधुनिक यंत्रणा व संगणकप्रणालीच्या माध्यमातून कापूस खरेदी केला जातो. कापसातून हवा वहन क्षमता, आद्र्रता, धाग्याची लांबी मोजून दर ठरविला जातो. त्यामुळे दर्जानुसार शेतकऱ्यांना दर मिळतो. प्रथमच अशा पद्धतीची यंत्रणा जिनिंग मिल मालकांनी कापूस खरेदीसाठी वापरली आहे. वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर कापसाचे पैसे बँकांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने किंवा धनादेशाद्वारे देण्यास प्रारंभ झाला होता. मागील वर्षी त्याचे पालन झाले. मात्र आता रोखीने व्यवहार सुरू झाले आहेत. गुजरातला जाणाऱ्या कापसाचा व्यवहार हा हवाला पद्धतीने होत आहे. या पद्धतीमुळे करचुकवेगिरी तर होतेच, पण अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरफार झाल्याने आता कापूस दोन ठिकाणी मोजण्याची मागणी शेतकरी करतात. वजन काटे विभागाने अद्याप तपासणी करून कुठेही कारवाई केलेली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर स्थिर आहेत. निर्यात ठप्प आहे. त्यात दुष्काळामुळे उत्पादन घटले आहे. कमी दरात कापूस विकायला शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे हंगाम सुरू होऊनही जिनिंग मिल सुरू झालेल्या नाहीत. फारच थोडय़ा मिल सुरू आहेत. हा उद्योग संकटात सापडला आहे. कामगारांवरही बेकारीचे संकट आले आहे. मिल मालकांवर व्याज तसेच अन्य खर्चाचा बोजा पडत आहे.

– प्रदीप जैन, खान्देश मिल असोसिएशन, जळगाव</strong>

शेतकरी कमी दरात कापूस विकत नाहीत. तेजी आणि मंदीतही त्यांना फायदा व्हायला हवा. म्हणून जििनग मिलमालकांनी कापूस खरेदी कराराने सुरू केली. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. दर वाढले, तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेलच. पण ते वाढले नाही तरी आजचे दर मिळतील. या पद्धतीमुळे जििनग मिलचे काम सुरू राहिले आहे. यापुढे प्रतवारीनुसारच कापूस खरेदी-विक्री होईल. त्याला शेतकरी, व्यापारी आणि मिलमालकांचा होकार आहे.

– प्रवीण शिंदे, कार्यकारी संचालक, वाय.के. जिनिंग मिल, वैजापूर