भाजपाचे नेते सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा रविवारी सायंकाळी आष्टी पोलिसांत दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या व्हायरल झालेल्या भाषणाच्या क्लिपवरून सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांनी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चात धस आणि धोंडे यांनी जमाव बंदी आदेशाचं उल्लंघन करून भाषण केलं होतं.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याचा व्हिडीओ शनिवारी सोशल माध्यमातून व्हायरल झाला. या व्हिडीओवरून बराच वादंग झाला. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांनी रविवारी आष्टीमध्ये मूक मोर्चा काढला होता. निवडणूक प्रचार संपल्यानंतरही धस आणि धोंडे यांनी आष्टीत प्रचंड मोर्चा काढला होता. त्यानंतर या मोर्चात धस यांनी भाषणही केले. धनंजय मुंडेंचा निषेध करायचा असेल तर भाजपला मतदान करून त्याचा निषेध नोंदवा, असं आवाहन धस यांनी मोर्चेकऱ्यांना केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यानंतर दोघांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, धनंयज मुंडे यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यांतर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत त्यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही व्हिडिओ क्लिप एडिट करून तयार करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ही व्हिडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.