उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक जीवाभावाच्या लहान-थोर कार्यकर्त्यांनी माने घराण्यावर दोन पिढय़ा निष्ठा ठेवून प्रेम केले आहे. हे प्रेम आपण कदापि विसरू शकत नाही. कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच आपले यापुढेही राजकीय व सामाजिक कार्य चालू राहणार आहे. निष्ठावंतांची कदर करताना गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना योग्य वेळी धडा शिकविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दिला.
सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रापासून अलिप्त राहिलेले दिलीप माने यांनी मंगळवारी प्रथमच जुळे सोलापुरात जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्यात संवाद साधला व स्वत:ची भूमिका विशद केली. काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. या मेळाव्यास हजारो माने समर्थक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याद्वारे माने गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन दिसून आले. या मेळाव्यास अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महापौर प्रा. सुशीला आबुटे, पालिका स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री, माजी महापौर अलका राठोड, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, उमाकांत राठोड, चंद्रकांत खुपसंगे आदींची उपस्थिती होती.
माने परिवाराला विरोध हा नवीन नाही. आपले वडील ब्रह्मदेव माने हे संघर्ष करीतच राजकारणात पुढे गेले. निवडणुकीत जय-पराभव होत राहतो. परंतु आपण ज्यांना विश्वास दिला, मदत केली, त्यांनीच विधानसभा निवडणुकीत गद्दारी केली व विरोधकांना साथ दिली, अशा गद्दारांना पक्षाने पुन्हा सामावून घेतल्याबद्दल दिलीप माने यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा रोख माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्याकडे होता. येत्या काळात आपण काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा निश्चित प्रयत्न करणार असून विशेषत: आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.