कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन उद्यापासून म्हणजे सोमवार ते दि. २७ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले राहणार आहे. या काळात देवाचे नित्योपचार बंद राहणार असल्याची माहिती, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशीचा मुख्य दिवस १९ नोव्हेंबर रोजी आहे. दरम्यान, दिवाळी आणि सलग सुट्टी यामुळे पंढरी नगरी हाऊसफुल्ल झाली आहे.

वारकरी सांप्रदायातील महत्वाची मानली जाणारी कार्तिकी वारी. या वारीसाठी मुंबई, कोकण, मराठवाडा, कर्नाटक येथून भाविक दरवर्षी न चुकता येतो. या वारीसाठी प्रशासन तयारीला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देखील येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि जलदगतीने दर्शन व्हावे यासाठी तयारी केली आहे. कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन १२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत २४ तास दर्शन खुले राहणार आहे. या काळात देवाचे नित्योपचार बंद राहणार आहेत. या काळात देवाची नित्यपूजा पहाटे ३.३०, महानेवैद्य सकाळी ११ आणि लिंबू पाणी रात्री ९ वाजता या कालावधीसाठी दर्शन बंद राहणार आहे. उर्वरित वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती ढोले यांनी दिली आहे.

दरम्यान, दिवाळीला लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरीत भाविक गर्दी करू लागले आहेत. विशेष करून शनिवार आणि रविवारी भाविकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. येथील मठ, धर्मशाळा, लॉजमध्ये भाविक उतरले आहेत. सध्या चंद्रभागा नदीला पाणी असल्याने भाविकांना स्नान तसेच नौकाविहार करता येत आहे. तर या काळात भाविकांना दर्शन लवकर व्हावे या करिता मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे. साधारणपणे भाविकाला दर्शन घेण्यासाठी अडीच ते तीन तास लागत आहे. मात्र या भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीतील अर्थकारणाला चालना मिळाली आहे. तसेच शहरातील अनेक भाविक ज्यांना कार्तिकी वारीला येण्यास जमणार नाही असे भाविक येथे येवून दर्शन घेवून गेले आहेत. असे असले तरी पंढरी नागरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.