नागपुरात उत्सवाला साधेपणाची किनार, उत्साहाला मात्र उधाण

पुणे/नागपूर/मुंबई : करोना विषाणू साथीमुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी, घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात गणेशभक्तांचा उत्साह नेहमीसारखाच आढळला. पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात राज्यभरात गणरायाची शुक्रवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. विधिवत पूजा करून घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

चैतन्याने भारलेल्या वातावरणात कानावर पडणारे सनई चौघडा वादनाचे सूर, मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अशा प्रसन्न वातावरणात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

करोना संकटामुळे यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने गणेश दर्शनाची ऑनलाइन सुविधा अनेक मंडळांनी उपलब्ध करून दिली आहे.  शासनाच्या नियमावलीचे पालन करीत साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी भर दिल्याचे यानिमित्ताने दिसून आले. करोनामुळे नीरस आणि साचेबद्ध झालेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गणरायाच्या आगमनाने उत्साह संचारला आहे. कार्यकर्त्यांनी मुखपट्टी परिधान करून उत्सवामध्ये सहभाग घेतला.

पुण्यामध्ये मानाच्या गणपती मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची मूर्ती परंपरेप्रमाणे पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. याच पद्धतीने मानाच्या तसेच महत्त्वाच्या गणेश मंडळांनी प्रथेप्रमाणे प्रतिष्ठापना सोहळा साजरा के ला.

पश्चिाम महाराष्ट्रात जल्लोष

पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत विघ्नहत्र्या गणरायाचे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत उत्साहात आगमन झाले. सकाळपासूनच घरोघरी मंगलमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी सार्वजनिक तरुण मंडळांच्या मूर्तींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक मिरवणुका, वाद्यांची पथके तसेच सजावटींना बहुतेक ठिकाणी बगल दिली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी मात्र अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाली. पावसाचा जोर शुक्रवारी काहीसा कमी झाल्याने कार्यकर्ते आनंदले होते.

औरंगाबादमध्ये उत्साह

ना गुलालाची उधळण, ना ढोल-ताशा-झांजांचे गगनभेदी निनाद…तरीही घरोघर गणरायाचे उत्साहात आगमन झाले. सकाळी १२च्या आत घरोघरचे, तर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी चार फुटापर्यंतच्या उंचीच्या गणरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा औरंगाबाद महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी वॉर्ड अधिकाऱ्यांनाच मंजुरीचे अधिकार दिले होते. दरम्यान, गणपती व महालक्ष्मी सणाच्या मखरासह षोडशोपचाराच्या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मात्र, ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये गर्दी उसळली होती. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत हे चित्र कमी-अधिक प्रमाणात दिसले.

मुंबईत शिस्तबद्ध सोहळा

मुंबई : गणाधिपती गणपतीच्या आगमनाचा उत्साह शुक्रवारी मुंबईत ओसंड़ून वाहत होता. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे उत्सवी वातावरण उत्साह आणि शिस्त यांचे एकत्रित दर्शन घडले. उत्साहाच्या भरात भविकांकडून करोनाविषयक निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही, याकडे पोलिसांचे कटाक्षाने लक्ष होते. कार्यशाळांच्या बाहेर, गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्यावर पोलिस तैनात होते. वाजंर्त्यांनाही समज देऊ न कुठेही नियमभंग होणार नाही यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. लालबाग, दादरसह धारावी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली आणि सर्वच उपानगरांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाविक खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. काही ठिकाणी मात्र प्रचंड गर्दी, घरगुती गणपतींच्या मिरवणुका, ढोल-ताशाचे वादन यांमुळे करोना नियमांचे उल्लंघन होत होते, परंतु पोलीस भाविकांना समज देत होते. बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवार आणि मंगळवारीच गणेशमूर्तींचे आगमन केल्याने यंत्रणेवर फारसा ताण नव्हता. शिवाय गर्दीही आटोक्यात होती. दादर बाजारपेठेत मात्र शुक्रवारी सकाळी झुंबड उडाली होती.

पत्रकाराला धक्काबुक्की

‘लालबागचा राजा’ या गणपती उत्सवाचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना उद्देशून पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरली. पत्रकारांकडे मंडळाचा अधिकृत परवाना असूनही त्यांना प्रवेश दिला गेला नाही. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकराला धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर मारहाण करण्याची भाषा पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी केली.

नागपुरात शांततेत आगमन 

नागपूर : ना ढोलताशांचा दणदणाट, ना गुलाल उधळण, ना मिरवणुका मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… अशा जयघोषात नागपुरात घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळांत गणरायाची साधेपणाने प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. करोनामुळे गेल्यावर्षी उत्सवावर कठोर निर्बंध होते. मात्र यंदा रुग्णसंख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सार्वजानिक मंडळांनी नियमांचे पालन करीत गणरायाच्या मूर्तींचे आगमन केले. शुक्रवारी रस्त्यांवर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र होता. यावेळी बहुतांश गणेशभक्तांनी करोना नियमांचे पालन करत उत्साहात गणरायांच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. दुपारी पाऊस आल्यामुळे अनेक मंडळांची अडचण झाली. मात्र पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा बालगोपालांसह युवकांचा उत्साह शिगेला पोहोचला. रेशीमबागेतील प्रसिद्ध ‘नागपूरचा राजा’चीही उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.