चोरीचा माल ओएलएक्स या वेबसाईटवर विकणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईतून ठाणे, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २० घरफोडया आणि चोऱ्यांची उकल झाली आहे. या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३१० ग्रँम सोन्याचे दागीने, ३६ मोबाईल फोन्स, ४ लॅपटॉप्स, ३ एलसीडी टिव्ही, १ कार आणि १ मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील विवीध भागात जाऊन चोऱ्या आणि घरफोड्या करायच्या आणि नंतर चोरी केलेल्या वस्तू ओएलएक्स वेबसाईटवर विकायच्या ही या टोळीची कार्यप्रणाली होती. मुंबई गोवा महामार्गालगत रायगड जिल्ह्यात त्यांनी गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या केल्या होत्या. मात्र पोलीस आरोपींपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाला या चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या टोळीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.

स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाच्या वतीने घरफोड्या आणि चोऱ्या मध्ये यापूर्वी अटक झालेल्याची चौकशी सुरु करण्यात आली होती.  २८ पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज रात्री एक या प्रमाणे आरोपींची तपासणी केली जात होती. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला काही प्रमाणाक आळा बसला होता. याच तपासणी दरम्यान एक आरोपी संशयित आरोपी स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाच्या तावडीत सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या राज्यातील विवीध भागात घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.

या टोळीच्या माध्यामातून रायगड जिल्ह्यात १८ तर ठाणे ग्रामिण आणि कोल्हापुर पोलीस दलाच्या हद्दीत प्रत्येकी एक असे एकुण २० घरफोड्या आणि चोऱ्या करण्यात आल्या होत्या. यात रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील ८ रसायनी मधील १, पेण मधील १, दादर सागरी मधील २ कोलाड मधील २ तर म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्ह्यांचा समावेश होता.

सुरवातीला टोळीचा मुख्य सुत्रधार मौअजम अवी बुलेन शेख स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागाने अटक केली. त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथून ताब्यात घेण्यात आले. यानंतर ईश्वर रमेश अडसुळे याला शिरढोण कोल्हापुर येथून, राकेश चांदिवडे यास कोपरखैराणे, नवी मुंबई येथून, सनी जैसवाल यास सावर्डे चिपळूण येथून, प्रविण कांदे याला नालासोपारा पश्चिम येथून तर शरद घावे यास वसई येथून ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सस्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या पथकाने ही कारवाई केली.