महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एमएसआरटीसी) एका चालकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. देशातील सर्वात मोठ्या राज्य परिवहन मंडळांपैकी एक असणाऱ्या एसटी महामंडळाने मागील चार महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. याचसंदर्भात या चालकाने मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवलं आहे. आश्चर्याचा बाब म्हणजे या पत्रामध्ये पगार देण्याची मागणी करण्याबरोबरच पगार देणार नसाल तर मला भारत चीन सीमेवर जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चालकाने केली आहे. “भारत चीन सीमेवर मी देशासाठी लढत सन्मानाने प्राण देईन” असं या चालकाने पत्रात लिहीलं आहे. २ जुलै रोजी पाठवलेल्या या पत्रासंदर्भात ‘मिड डे’ वृत्तपत्राने बातमी दिली आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या आनंद हेलगावकर या चालकाने हे पत्र लिहिलं आहे. मुंबई सेंट्रल आगारामध्ये कार्यरत असणारे आनंद हे १९९९ पासून एसटीचे चालक म्हणून काम करतात. मात्र मागील काही काळापासून त्यांना सतत प्रकृतीसंदर्भातील अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. तसेच आनंद यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या आईलाही प्रकृतीसंदर्भात तक्रारी आहेत. त्यातच पगार वेळेत होत नसल्याने संपूर्ण कुटुंबाचे हाल होत असल्याचे आनंद यांनी म्हटलं आहे. हे पत्र पाठवल्यानंतर आनंद यांनी आपला फोन बंद करुन ठेवला असून एमएसआरटीसीने या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवण्यामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. अगदी पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यापासून दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यापर्यंत अनेक काम एसटीच्या माध्यमातून करण्यात आली.

आनंद यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात विचारले असता उत्तर देताना महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेच्या संदीप शिंदे यांनी पगार वेळेवर दिले जात नसल्याची माहिती दिली खरी असल्याचे सांगितले. खास करुन मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील कर्मचाऱ्यांना पगार देण्यासंदर्भात उशीर होत असल्याचेही शिंदे म्हणाले. एसटीचे कर्मचारी दिवस रात्र काम करत असून त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कारभार सुरु आहे, असं असतानाही त्यांनाच अशाप्रकारची वागणूक दिली जात असल्याचे सांगत शिंदे यांनी पगार देण्यासाठी होत असलेल्या विलंबासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

“राज्यामध्ये लॉकडाउनमुळे एसटी बंद असल्याने एमएसआरटीसीला दिवसाला २३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा खूप मोठा फटका आहे. एसटीला उत्पन्नच मिळत नसल्याने पगार देण्यासंदर्भातील अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई आणि उपनगरातील कर्मचारी वगळता राज्यभरातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीने मार्च महिन्याचा ७५ टक्के पगार एप्रिलमध्ये देण्यात आला. एप्रिलचा १०० टक्के पगार मे महिन्यात देण्यात आला तर मे महिन्यात ५० टक्के पगार जूनमध्ये देण्यात आला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना थकीत पगार आणि जूनचा पूर्ण पगार देण्याची गरज आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबरच परिवहन मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. एसटी महामंडळाला आणि कर्मचाऱ्यांना या संकटातून वर काढण्यासाठी दोन हजार कोटींची हमी द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे,” असं शिंदे म्हणाले.

महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व निर्णय थेट परिवहन मंत्री घेतात अशी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे जूनमध्येही केवळ ५० टक्के वेतन देण्यात येणार असल्याचे संकेत आम्हाला देण्यात आल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे ‘मिड डे’ने म्हटलं आहे.