करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय, दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांचेही पेपर रद्द करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

त्यांना एका व्हिडिओद्वारे या निर्णयांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, “राज्यातील नववी आणि ११ वीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यासाठी पहिल्या सत्राचा आधार घेतला जाणार आहे. पहिल्या सत्रात झालेल्या चाचण्या आणि प्रात्याक्षिके व अंतर्गत मूल्यमापन करून या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल. याशिवाय इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला देण्यात आले आहे.”