धवल कुलकर्णी

१४ एप्रिलला देशातली टाळेबंदी (लॉकडाउन) संपल्यानंतर महानगरं आणि काही बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. टाळेबंदीचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होतो आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते म्हणणे आणि वास्तव हे वेगळे आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ग्रामीण भागात १४ एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी आमची मागणी आहे. कारण खेड्यांमध्ये करोनाचा फार प्रसार झालेला नाही. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे क्वारंटाइन ठेवण्यात आले . सरकार परदेशातून आलेल्यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवतं आहे. अशात ग्रामीण भागातील लोकांनीही बाहेरुन लोकांनाही ही प्रक्रिया पार पाडायला लावली. आता बाहेरुन माणसं आलीच नाहीत तर रोगाचा फैलाव कसा काय होईल? असाही प्रश्न शेट्टी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना विचारला.

मुंबई, पुणे, नाशिक यांसारखे बाधित भाग सोडले तर महाराष्ट्रात इतरत्र लॉकाउनचे निर्बंध १४ एप्रिलनंतर उठवण्यात यावेत अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत मात्र त्यांची संख्या वाढलेली नाही त्यामुळेच ही मागणी करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सरकारने केलेले दावे हे फक्त बातम्यांपुरतेच आहेत अशीही टीका त्यांनी केली. बऱ्याच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर द्राक्षे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणूनच १४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातले निर्बंध उठवले जावेत असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.