कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी महापालिकेत प्रवेश करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ , काँगेसचे आमदार सतेज पाटील यांना रोखठोक उत्तर देणारे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यावर हक्कभंग ठराव आणला जाणार आहे.

बाणेदारपणे उत्तर देणारे सुरज गुरव यांच्या भूमिकेचे तरुणाईने व्हाट्सअँपच्या ‘डीपी’ वर त्यांची सिंघम स्टाईल छायाचित्रे लावून स्वागत केले असले तरी त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे आमदार हसन मुश्रीफ संतापले आहेत. त्यांनी सुरज गुरव यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

मलईदार पदासाठी हे पोलीस अधिकारी चमचेगिरी करतात. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापुरात ‘चहा पेक्षा किटली गरम’ झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. गोकुळच्या सर्वसाधारण सभेवेळी पोलिसांना सभा स्थळाचा ताबा घेण्यास सुचवले होते तेव्हा त्यांनी त्यास याला नकार दिला. पण आजमात्र महापालिकेसमोर याउलट पाहायला मिळाले.

जे पोलीस अधिकारी आम्हाला ताबा घेऊन ओळखपत्र दाखवूनच सभासदांना आत सोडण्यासाठी नकार देत होते तेच अधिकारी आज ओळखपत्र तपासण्याची काम करत होते. ओळखपत्र तपासण्याचे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केले गेले पाहिजे, ते वैधानिकदृष्ट्या पोलिसांचे काम नव्हे. हीच बाब आम्ही त्यांना सांगत असतानाही त्यांनी आमच्यावरच आक्रमक होत शाब्दिक वादाला सुरुवात केली. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करणार आहे असे मुश्रीफ म्हणाले.