लॉकडाउन हेच धोरण ठरवता कसं येईल? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.  रॅपिड टेस्टिंग आणि इतर चाचण्यांची संख्या वाढवलं का जात नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच सध्या वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था यामध्ये ताळमेळ नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मी लॉकडाउनच्या विरोधात मुळीच नाही. मात्र आता लॉकडाउन हेच धोरण कसं काय असू शकतं? अनलॉक सुरु असताना आपण लॉकडाउन पुन्हा जाहीर केला आहे. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आयसीयूचे बेड आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. शासनाने जी खरेदी प्रक्रिया सुरु केली आहे ती वेगवान नाही. ती प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे असाही सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.

आयुक्तांच्या बदल्या योग्य नाहीत

“महापालिका आयुक्तांच्या बदल्या करणं हे काही चांगलं धोरण आहे असं वाटत नाही. सरसकट अनेक आयुक्तांच्या बदल्या सुरु आहेत. करोनाविरोधातल्या लढाईत सातत्य हवं. आयुक्तांच्या बदल्या केल्या तर ते सातत्य संपतं. आपलं अपयश आयुक्तांची बदली करुन सरकार आपलं अपयश झाकतं आहे का? असा प्रश्न मला पडतो” असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ठाणे जिल्ह्यात अनेक आयुक्तांच्या बदल्या झाल्या. याची माहिती ठाणे जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही ठाऊक नव्हतं असं मला माध्यमातून समजतं आहे. महाविकास आघाडीत, मंत्र्यांमध्ये, कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री, अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. लॉकडाउनसारखे निर्णय घेताना थोडासा विस्ताराने विचार केला पाहिजे. मी लॉकडाउनचा विरोध करत नाही. मात्र लॉकडाउन हे एकच धोरण कसं काय असू शकतं? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.