पत्नीकडे पैशांची मागणी केली असता ती पूर्ण न झाल्याने संतापलेल्या पतीने आपले घर जाळून टाकण्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. जेलरोड येथील सिंधी कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. ज्योती हेमनानी यांचा २००५ मध्ये प्रकाश वासुदेव हेमनानी याच्याशी विवाह झाला. विवाहानंतर २००५ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत प्रकाशने पत्नीकडे वारंवार पैश्यांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे.

ज्योतीच्या भावाने ६ लाखाचा धनादेश देऊनही प्रकाशने पत्नीला शिवीगाळ व मारहाण सुरूच ठेवली. माहेरून पुन्हा पैसे आणण्यासाठी छळ करू लागला. पैसे देण्यास ज्योती यांनी नकार दिल्याने प्रकाशने सिंधी कॉलनीतील आपल्या फ्लॅटला ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावून दिली. आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात ज्योती हेमनानी यांनी पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.