भाजपाकडून राज्यसभेसाठी राज्यातील तीन जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. माजी महसूल मंत्री आणि राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र, त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. यावर खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे म्हणाले, “मला राज्यसभेची उमेदवारी मिळावी अशी भाजपा प्रदेशाध्यक्षांची आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. पण माझी सून आधीच लोकसभेची सदस्य आहे. त्यामुळे मलाच ही उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मला केवळ राज्याच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवाऱ्यांबाबत कुठलेही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.”

आणखी वाचा- काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजीव सातव?

दरम्यान, भाजपाने यापूर्वीच तीनपैकी दोन उमेदवारांची नावे घोषीत केली होती. यामध्ये उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर गुरुवारी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आणखी वाचा- राज्यसभेसाठी भाजपाचा तिसरा उमेदवार निश्चित, डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १३ मार्च (उद्या) आहे. संख्याबळानुसार महाविकासआघाडीचे चार तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.