म्होरक्यांना पकडण्यासाठी तीन पथके रवाना

अकोल्यात उघडकीस आलेल्या किडनी तस्करी प्रकरणाची राज्यातील अनेक मुख्य शहरांमध्ये जाळे असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या माध्यमातून अनेक गरजूंना गाठून त्यांच्या किडनी विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. औरंगाबाद येथील एका रुग्णालयात किडनी काढण्याचा प्रकार झाल्याचेही तपासात समोर आले आहे.
अकोल्यातील शिवाजीनगरात आनंद भगवान जाधव (३०) याने संतोष शंकर गवळी याला व्याजाने २० हजार रुपये दिले होते. कर्जाची परतफेड करता न आल्याने आनंद जाधव याने गवळीला किडनी विकण्यास भाग पाडले. या प्रकरणातील देवेंद्र शिरसाट याने गवळीचे तत्काळ सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूरचे शिवाजी कोळी यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांनी गवळीला यवतमाळ येथील डॉ. मंगला आणि डॉ. सुहास श्रोत्री दाम्पत्याकडे आणले. नागपुरातील एका डॉक्टरच्या सहाय्याने संतोष गवळीच्या नागपूरमध्ये तपासण्या करून त्याला कोलंबोत नेऊन किडनी काढण्यात आली. त्यासाठी गवळीला ३ लाख रुपये देऊ न त्याची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी अकोला पोलिसांची तीन पथके सांगली, औरंगाबाद व नागपूरला रवाना झाली आहेत. या प्रकरणातील अकोल्यातील आणखी काही पीडित समोर आले आहेत. एकूण चार जणांच्या किडनी काढण्यात आल्याची माहिती आहे. एकाची किडनी काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो बचावला.

तपास सुरू
किडनी तस्करीचे गंभीर प्रकरण असून कसून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असून, अद्याप आरोपींचा सुगावा लागू शकलेला नाही. या प्रकरणातील सर्व आरोपी लवकरच गजाआड होतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.