संदीप आचार्य
करोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असून या आजारानं लाखो लोकांचा बळी घेतला आहे. आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रात करोनाचे विपरित परिणाम झाले असून ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने याची दखल घेऊन ‘एमबीबीएस’ च्या वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘महामारीचे व्यवस्थापन’ ( पँडॅमिक मॅनेजमेंट) या विषयाचा समावेश केला आहे. ‘एमसीआय’ चे अध्यक्ष डॉ. विनोद कुमार पॉल यांनी कालच याबाबतचा निर्णय जाहीर केला.
जगभरातील बहुतेक देश आजही करोनाचा सामना कसा करायचा या प्रश्नात अडकले आहेत. गेले सहा महिने भारतातही करोनाला अटकाव करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन योग्य की अयोग्य, या महामारीचा सामना करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, सामाजिक पथ्य काय पाळायची, उपचार काय असतील इथपासून लस कधी येणार असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. एकीकडे करोनाचे रुग्ण व मृत्यूचे आकडे वाढत आहेत तर दुसरीकडे अजूनही लॉकडाउन, मास्क, सोशल डिस्टंसिंगवरून टिका-टिप्पणी सुरु आहे. रेमडिसीवीर व टेलिलोझुमॅब ही औषधे करोनावर फारशी उपयोगी नाहीत व मृत्यू रोखण्यासाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही डॉक्टरांकडून रुग्णांना ही औषधे आणण्यासाठी आग्रह सुरुच आहे.
या पार्श्वभूमीवर ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ तसेच त्यांची गव्हर्निंग बॉडी आणि नीति आयोगाने वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘पँडॅमिक मॅनेजमेंट’ या विषयाचा समावेश असावा अशी भूमिका घेतली. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ तज्ज्ञ डॉक्टरांची समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने गेले दीड महिना सखोल अभ्यास करून ‘ महामारी व्यवस्थापन’ विषयाची मांडणी केली असून ‘एमसीआय’ या नवीन विषयाचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या समितीत डॉ. कृष्णा शेषाद्री, डॉ. आर. कुमार, डॉ. प्रवीण सिंग, डॉ. पी. व्ही. विजयराघवन, डॉ. पी. व्ही. चेलम, डॉ. तेजिंदर सिंग, डॉ. सुबीर मौलिक व डॉ. एम. राजलक्ष्मी यांचा समावेश होता.
या घटकांचा समावेश
या विषयाच्या अभ्यासात जागतिक महामारीचा इतिहास, आजाराच स्वरुप, रुग्णतपासणी, सामाजिक दृष्टीकोन, कायदेशीर बाबी, आजार व्यवस्थापन, प्रशासकीय बाबी तसेच आरोग्याचे अर्थशास्त्र, साथरोग, तसेच संशोधन, लस विकास आणि शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील उपचार आदीचा समावेश करण्यात आल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. सध्या हा विषय एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी असला तरी यापूर्वी इबोला, सार्स, बर्डफ्लू, अशा अनेक साथींचा सामना जागतिक स्तरावर करावा लागला आहे. करोनाचा विचार करता आगामी काळात नवीन महामारी आल्यास भारतीय डॉक्टर त्याचा सामना करण्यासाठी सर्वार्थाने तयार असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन एमबीबीएस च्या सर्व वर्षात ‘महामारीचे व्यवस्थापन’ हा विषय शिकवला जाणार असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.
