शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय जाधव यांच्या जंगम व स्थावर मालमत्तेत ५ वर्षांत सात पट, तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या संपत्तीत चार पट वाढ झाली. जाधव यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात ३ कोटी ३१ लाख ६५ हजार, तर भांबळे यांच्या शपथपत्रात १ कोटी ४९ लाख ४५ हजार रुपये संपत्ती दाखवली आहे.
सन २००९मध्ये जाधव यांनी परभणी विधानसभेची निवडणूक लढविली. त्या वेळी दाखवलेल्या जंगम व स्थावर मालमत्तेत ४७ लाख ६५ हजार एवढी संपत्ती दाखवली होती. बुधवारी दिलेल्या शपथपत्रात जाधव व त्यांची पत्नी क्रांती यांची एकत्रित मालमत्ता ३ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपये आहे. यात एकूण ३७ लाख ६५ हजार जंगम मालमत्ता आहे. जाधव यांच्या नावे १ कोटी २१ लाख, तर श्रीमती जाधव यांच्या नावे १ कोटी ४३ लाख स्थावर मालमत्ता आहे. त्यांना बँकेचे ६० लाख देणे आहे. त्यांच्याकडे सव्वातीन कोटीपेक्षा जास्त रुपयांची सध्या मालमत्ता आहे. जाधव यांच्यावर विविध कलमांखाली सात गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार भांबळे यांनी २००९मध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्या वेळी दिलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण संपत्ती १० लाख ७८ हजार रुपये होती. बुधवारी दिलेल्या शपथपत्रात एकूण संपत्तीचे मूल्य १ कोटी ५० लाख रुपये आहे. त्यांना बँक व इतर वित्तीय संस्थांचे साडेनऊ लाख रुपये देणे आहे. पती-पत्नी व मुलांच्या नावावर ९६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून स्थावर मालमत्ता ७८ लाख ५० एवढी आहे. वारसा हक्काप्रमाणे मिळालेली मालमत्ता २५ लाख एवढी दर्शविली आहे. गेल्या ५ वर्षांत भांबळे यांच्या संपत्तीत जवळपास चारपट वाढ झाली. भांबळे यांच्यावर विविध कलमांखाली दोन गुन्हे दाखल आहेत.