केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री नागपूरचे असतानाही शहराची दुरावस्था झाली आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाच्या तळघरात पाणी शिरल्याने सोमवारपर्यंतचे कामकाज रद्द करण्यात आल्याने ही परिस्थिती समोर आली आहे. सरकारच्या कामाचे हे परिणाम आहेत. शहरात नाले सफाई योग्य प्रकारे झाली नाही, गटारांमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत, असा या सरकारचा कारभार सुरू आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली.

पुण्यातील ईद मिलन कार्यक्रमापूर्वी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित होणार आहेत. अजित पवार म्हणाले, नागपूर अधिवेशन हे पाण्यात गेले असून त्याचे नियोजन करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. विधान भवन परिसरात पाणी शिरल्याने तसेच वीज गायब झाल्याने सभागृहाचे कामाचे दिवस वाया गेल्याने आता हे अधिवेशन एक आठवड्याने पुढे वाढवण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

नेहमी अधिवेशनाला आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारपासून सुरूवात होते. मात्र, सरकारने यंदा हे अधिवेशन मुहूर्तपाहून बुधवारपासून सुरू केले. यामधून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीका यावेळी पवार यांनी केली. आधिवेशन पाण्यात गेले तरी यावर सरकारकडून कोणीही बोलण्यास तयार नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी यावर उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभाव जाहीर करणे म्हणजे मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याचेही अजित पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, नागपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून शहरपूर्णपणे जलमय झाले आहे. येत्या ४८ तासांत येथे वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हा प्रशासनाकडून नागपूरातील सर्व शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे.