‘‘अब पछताने से क्या फायदा, जब चिडियाँ चुग गई खेत’..? शेतातील उभे पीक चिमण्यांनी खाऊन टाकल्यानंतर आता पश्चात्ताप करून काय फायदा? निवडणूककाळात चुकीची विधाने केल्याने नेत्यांपेक्षा पक्षाचेच मोठे नुकसान होते. वर्षांनुवष्रे मन लावून गावपातळीवर काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो, याचे भान ठेवले जाणार आहे की नाही?’’
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना वरील शब्दांत खंत व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विलासराव देशमुख, सुशीलकुमार िशदे, अशोक चव्हाण यांच्याबद्दल केलेले विधान काँग्रेस पक्षासाठी मारक, तसेच दुर्दैवी असल्याचे अॅड. झंवर यांनी सांगितले. आपल्या फेसबुकवरून ही नाराजी जाहीररीत्या, मात्र चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकीत शीर्षस्थ नेत्यांनी प्रत्येक विधान काळजीपूर्वक केले पाहिजे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ज्या नेत्यांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले, त्यांच्या बाबतीत चुकीचे विधान करून त्यातून पक्षाची हानी करण्याचे काम चव्हाण यांनी केले. त्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत तीव्र संताप असल्याचे झंवर यांनी म्हटले आहे.
मतदानानंतर तीन दिवसांनी चव्हाण यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली व ‘ते’ विधान अनवधानाने केल्याचा खुलासाही केला. त्यावर झंवर यांनी शेतातील पीक चिमण्यांनी खाऊन टाकल्यानंतर पश्चात्ताप करून काय फायदा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मतदानानंतर सर्वच चाचण्यांत काँग्रेसला केवळ ४० जागा दाखवल्या आहेत. एकेकाळी रेल्वे बोगीतही न मावणारे आता मिनीबसमध्ये बसतील, इतकीच संख्या येणार असेल तर त्यासाठी दोष द्यायचा कोणाला? असा प्रश्न उपस्थित करून झंवर यांनी चव्हाण यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.