ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यावर आधारित ‘हेमलकसा’ हा हिंदी चित्रपट भारतातून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार असल्याने हेमलकसातील लोकबिरादरी प्रकल्पात आनंदाचे वातावरण आहे.
गडचिरोली जिल्हा ३५ वर्षांंपासून नक्षल्यांच्या हिंसाचारात पोळत आहे. येथे नक्षल चळवळ रुजण्याच्या पूर्वी म्हणजे, १९७० च्या दशकात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश बाबा आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. आज या प्रकल्पाला ४४ वष्रे पूर्ण झालेली आहेत. डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या समाजकार्याची दखल भारतासह संपूर्ण जगाने घेऊन पद्मश्री, मॅगसेसे, मदर टेरेसा यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा मराठी, तर ‘हेमलकसा’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. मराठीतील चित्रपटाला राज्यातील रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, तर हिंदीतील ‘हेमलकसा’ची भारतातून आस्कर स्पध्रेसाठी निवड करण्यात आल्यामुळे डॉ. आमटे दाम्पत्याची आत्मकथा आस्करवारीच्या निमित्ताने संपूर्ण जगात पोहोचणार आहे. या चित्रपटामुळे डॉ. आमटे दाम्पत्याचे कार्य समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले, अशी माहिती त्यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.सध्या‘हेमलकसा’ या चित्रपटाचे प्रिमियर शो सुरू आहेत. ऑस्करवारीनंतर त्याची चांगली प्रसिध्दी होऊन त्यानंतर तो काही भागात प्रदर्शित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.