मागच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं आहे. जिथे नुकसानग्रस्तांना ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत. सर्वात आधी त्या लोकांची राहण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले आहेत फडणवीस?
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणची अवस्था वाईट झाली आहे. नुकसानग्रस्तांना जिथे ठेवलं गेलं आहे तिथली अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. या सगळ्यांची राहण्याची सोय योग्य ठिकाणी केली पाहिजे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. शेती, फळबागांचे झाले तर ते पुढच्या वर्षी भरुन निघत असते. पण इथे तर झाडंच राहिली नाहीत. पुढच्या ५ ते १० वर्षांनी त्यांचे उत्पन्न सुरु होईल. अशा स्थितीत फक्त हेक्टरी मदत जाहीर करुन भागणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

भविष्यात १०० टक्के फळबाग अनुदानाचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. सरकारने केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. मासेमारी करणाऱ्या बांधवांचीही मी भेट घेतली. त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या होड्या खराब झाल्या आहेत. त्यांची किंमत १ ते २ लाख रुपये आहे. मागील काही काळात ३ वेळा वादळाचा फटका बसला. त्यामुळे त्यांना मागील काही दिवसात मासेमारी करण्यासाठीही जाता आलेले नाही. त्यामुळे सरकारने मासेमारी करणाऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी.

कोकणात घरांची मोठी पडझड झाली आहे. राज्याने सध्या दीड लाख रुपये देऊ असं सांगितलं आहे. मात्र एवढ्याने काही होणार नाही. आम्ही आमच्या वेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत केली होती. आता लोकांना घरावर छतं लावायची आहेत त्याचाही काळा बाजार सुरु झाला आहे. सराकारने हा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.