दयानंद लिपारे, कोल्हापूर

दोन खासदार आणि आठ आमदार निवडून आणण्याची राणा भीमदेवी थाटाची घोषणा शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील मंचावर सातत्याने केली जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर जिल्हा भगवा करण्यात शिवसेनेला दणदणीत यश आल्याने शिवसेना नेत्यांची ही घोषणा तशी अव्यवहार्य वाटत नसली तरी पक्षांतगर्त बेदिली हे शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरले आहे.

कोल्हापूर शहरप्रमुख पदात बदल घडवून आणून शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपले पक्षातील वजन दाखवून दिले असताना आता त्यांनी जिल्हाप्रमुखांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत ही दोन्ही पदे बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावरही ते उभय काँग्रेसच्या नेत्यांच्या गोतावळ्यात असतात अशी तोफ क्षीरसागर यांनी डागली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या गडाला भेदण्याचे काम गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत झाले.  कोल्हापूर जिल्ह्य़ात तर शिवसेनेचा प्रभाव खूप आधीपासूनचा. पण चांगले यश मिळाल्यावर कोल्हापूर शिवसेनेला दुफळीचा शाप लागला.

संजय मंडलिक वादाचे दुसरे केंद्र शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक यांच्याकडे पाहिले जाते. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नंतर संजय मंडलिक यांनीही लोकसभेचा गड सर करण्याच्या गेल्या वेळी प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याकडून ते ३३ हजार मतांनी पराभूत झाले. यंदा पुन्हा त्यांना आखाडय़ात उतरवण्याची तयारी सेनेने केली आहे, मात्र क्षीरसागर यांनी त्यांच्याविषयी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ‘मंडलिक हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात अधिक असतात, त्यांच्या नेत्यांना सोबत घेऊन ते कार्यक्रम करतात’ हा त्यांचा मुख्य आक्षेप. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार समारंभ केला जातो. पहिल्या वर्षी संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले. दुसऱ्या वर्षीं वैरभाव विसरून शरद पवार यांना निमंत्रित केल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीच्या कच्छपि लागल्याची चर्चा सुरू झाली. यंदा त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाचारण केले.

या दोन्ही कार्यक्रमांना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते हे शिवसेनेचे नेतेच प्रमुख पाहुणे होते. खेरीज, मंडलिक यांचे आमदार हसन मुश्रीफ – आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेले कार्यक्रम हेही वादाला कारण ठरले. या वादानंतरही मंडलिक यांनी आपण शिवसेनेकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, गेल्या आठवडय़ात त्यांनी कोल्हापुरातील विविध पेठांमध्ये संपर्क दौरा करून प्रचाराला आरंभ केला आहे.  क्षीरसागर हे आक्षेप नोंदवत असताना शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मंडलिक यांचा शिवसेनेशी धागा जुळला आहे. शिवसेनेच्या कार्यक्रमात ते उघडपणे दिसतात असे नमूद करीत त्यांच्यावरील आरोप बाजूला केले आहेत. याही पातळीवर आमदार विरुद्ध जिल्हाप्रमुख या वादाची राळ उडालेली आहे.

वादास कारण..

कोल्हापूर शिवसेनेत आमदार क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार – विजय देवणे असा वाद सर्वश्रुत आहे. क्षीरसागर यांच्या शिफारशीवरून दुर्गेश लिंग्रस यांना शहर प्रमुखपद मिळाले, पण काही काळातच दोघात कटुता आली. हा वाद दोन वर्षांपूर्वी इतका चिघळला व त्यातूनच लिंग्रस यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. वरिष्ठांपर्यंत तक्रारी झाल्या. त्यांनी संबंधितांचे कान टोचले. हा वाद शमला असे वाटत असतानाच आता लिंग्रस यांना पदावरून काढण्यात आले असून नवे शहरप्रमुख म्हणून दोन महिन्यांपूर्वीच शिवबंधन बांधलेले रविकिरण इंगवले यांची निवड झाली आहे. त्यासाठी क्षीरसागर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. इंगवले हे तसे महाडिक यांचे समर्थक पण आता ते क्षीरसागर यांच्या बाजूने झुकले आहेत. इंगवले यांचे समर्थन करताना क्षीरसागर यांनी जुन्या वादाला नव्याने फोडणी दिली. जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पदावरून बदलण्याची गरज त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. बदल कोणत्या कारणांसाठी हे त्यांनी स्पष्ट केले नाही पण याची कारणे वरिष्ठांना सविस्तरपणे दिली असल्याचे ते सांगतात. क्षीरसागर यांनी टोचल्याने पवार यांनीही शस्त्रे परजली आहेत.