करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी अद्याप कुठलेली ठोस औषध उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टंसिंग हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची ताकद काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंगळवारी देशवासियांशी संवाद साधताना करोनापासून वाचण्यासाठी सध्या सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले होते. पंतप्रधानांच्या याच विचाराला पुढे घेऊन जात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ शेअर करताना ‘चला सोशल डिस्टंसिंगची ताकद समजून घेऊया” असं आवाहन जनतेला केलं आहे.

आणखी वाचा- आज गुढी उभारणार नाही, कारण…; पंकजा मुंडे यांनी केला निर्धार

या व्हिडिओत म्हटलं आहे की, एक करोनाबाधित व्यक्ती पाच दिवसांमध्ये २.५ लोकांना बाधित करु शकते. याप्रमाणे ती तीस दिवसांत ती ४०६ लोकांना बाधित करु शकते. जर या बाधित व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करुन लोकांशी ५० टक्क्यांनी संपर्क कमी केला तर पाच दिवसांत ती १.२५ लोकांना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ १५ लाकांना ती बाधित करु शकते. तसेच जर या व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अधिक कडक अंमलबजावणी केली आणि लोकांशी ७५ टक्क्यांनी संपर्क कमी केला तर ती व्यक्ती ५ दिवसांत ०.६२५ लोकाना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ २.५ लोकांनाच या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधा होऊ शकते.

अशा प्रकारे सोशल डिस्टंसिंगची जितकी कडक अंमलबजावणी तुम्ही कराल तितका करोना विषाणूचा संसर्ग समाजात कमी प्रमाणात होईल हे या आकडेवारीतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.