12 December 2019

News Flash

कवठेमहांकाळमध्ये हजार वर्षांपूर्वीचा वीरगळ लेख प्रकाशात

आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला.

कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावच्या विठ्ठल मंदिरानजीक आढळलेला वीरगळ शिलालेख.

दिगंबर शिंदे

सांगलीच्या चालुक्यकालीन इतिहासावर प्रकाश

गेल्या आठवडय़ात विटय़ाजवळील भाळवणी येथे चालुक्य राजवटीत जैन मंदिराला दान दिल्याचा शिलालेख उजेडात आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे याच कालखंडातील धारातीर्थी पडलेल्या वीर योद्धय़ाच्या स्मरणार्थ कोरण्यात आलेला वीरगळ लेख प्रकाशात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाने हे ऐतिहासिक संदर्भ शोधल्यामुळे सांगली परिसर सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत महत्त्वाचा भाग होता हे स्पष्ट होत आहे.

चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर उर्फ भ्वनेकमल्ल (इ.स. १०६८ ते १०७६) याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील एका योद्धय़ाला वीरमरण आले होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यतील हा पहिला लेखयुक्त वीरगळ असून, महाराष्ट्रामध्ये आढळलेल्या वीरगळ लेखात तो सर्वात जुना असल्याचेही समोर आले आहे.

आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे. खालील भागात एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समूहाशी लढाई करताना दाखविला आहे. वरील कलशाकृती भागावर आणि मधील टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. वीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), सरपंच व्यंकटराव पाटील, तुकाराम गुरव, सागर शेटे आणि नबीलाल तांबोळी यांचे सहकार्य लाभले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच यासंदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या लेखाच्या संशोधनाने सांगली जिल्ह्यच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे. हा वीरगळ लेख वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केला आहे. त्यावर खालच्या टप्प्यात संबंधित वीर पुरुषाने केलेल्या लढाईचे शिल्प असून त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरुषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प आहे. अगदी वरील भागात हा वीर शिविलगाची पूजा करताना दाखविलेला आहे. मिरज इतिहास संशोधक मंडळाचे प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी या वीरगळ लेखाबाबतची माहिती दिली.

First Published on April 17, 2019 2:44 am

Web Title: light on chalukyya history of sangli
Just Now!
X