सैनिकांच्या पत्नीविषयी वादग्रस्त विधान करणा-या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला आहे. परिचारक यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार असून या समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांचे निलंबन केले जाईल असे  चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

आमदार प्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांना निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे येथील प्रचारसभेत त्यांची जीभ घसरली होती. या सभेत परिचारक यांनी राजकारण काय असते हे सांगताना सीमेवरील जवानाचा दाखला दिला होता. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’ असे संतापजनक विधान त्यांनी केले होते.

[jwplayer kCpGfFAr-1o30kmL6]

बुधवारी विधान परिषदेत प्रशांत परिचारक वादावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. पाटील म्हणाले, प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांचे निलंबन केले जाईल असे त्यांनी सांगितले. एखाद्या सदस्याला त्याचे म्हणणे मांडू न देता त्याच्यावर कारवाई करणे योग्य ठरत नाही असेही त्यांनी नमूद केले. आता परिचारक यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[jwplayer n8mX3b6H-1o30kmL6]

सीमेवरील जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीची मागणी करून भाजपला घेरण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत शिवसेनाही सहभागी झाली होती. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमदार परिचारक यांना निलंबित करावे, असा प्रस्ताव मांडला. त्याला काँग्रेसचे शरद रणपिसे व भाई जगताप यांनी पाठिंबा दिला.