22 January 2021

News Flash

धुळे भाजपमध्ये ‘धुळवड’

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येणाऱ्यांच्या प्रवेशावर गोटे यांनी आक्षेप घेतला होता.

अंतर्गत वाद उफाळला, आमदार अनिल गोटेंना नारळ देण्याचे स्पष्ट संकेत 

संतोष मासोळे, धुळे

महापालिका निवडणुकीची सूत्रे भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यापासून पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे नाराज असून पक्षाबरोबर असलेल्या त्यांच्या वादाने निर्णायक वळण घेतले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात गोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानंतर भाजपने त्यांना नारळ देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गोटे यांनीही भाजपच्या मंत्र्यांशी दोन हात करण्याची तयारी करीत महापौरपदासाठी आपणच भाजपचे उमेदवार असल्याचे जाहीर करून टाकले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेल्या भाजपमधील संघर्षांचा लाभ नेमका कोणाला होणार, याची समीकरणे मांडली जात आहेत.

महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत मतभेद पराकोटीला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल गोटे यांना डावलून पक्षाने निवडणुकीची संपूर्ण धुरा गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. हा निर्णय झाल्यापासून गोटे यांनी आक्रमक भूमिका घेत महाजन यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर तोफ डागण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. इतकेच नव्हे, तर इच्छुकांच्या समांतर मुलाखती घेऊन वेळ पडल्यास राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचे आधीच जाहीर केले. महिना-दीड महिन्यापासून धुमसणारा हा वाद प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीही जवळून अनुभवला.

लोकसभा निवडणुकीच्या आढावा दौऱ्यादरम्यान दानवे यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निमंत्रण गोटे यांना नव्हते. फलकांवर कुठेही त्यांचे छायाचित्रही नव्हते. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या गोटेंचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट मेळाव्यात प्रवेश करून भाषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोटे समर्थकांनी गोंधळ केला. अखेर पोलीस बंदोबस्तात गोटे यांना बाहेर नेण्यात आले. प्रदेशाध्यक्ष दानवे, महाजन, डॉ. भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमक्ष हा संपूर्ण प्रकार घडला. स्वपक्षाच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या आमदाराला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. कोणाची दादागिरी भाजप खपवून घेणार नाही. पुढील निवडणुकीत धुळ्यात भाजपचाच आमदार होईल, असे सांगत दानवे यांनी गोटे यांची पक्षातील परिस्थिती अवघड असल्याचे सूचित केले. त्यांच्यावर महापालिका निवडणुकीपूर्वी कारवाई केली जाईल की नंतर हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येणाऱ्यांच्या प्रवेशावर गोटे यांनी आक्षेप घेतला होता. त्यास दानवे यांनी उत्तर दिले. परस्पर मुलाखती घेण्याची गोटेंची कृती भाजपने गांभीर्याने घेऊन उमेदवारांची निवड राज्य, जिल्ह्य़ाचे संसदीय मंडळ करणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या कार्यपद्धतीमुळे संतप्त झालेल्या गोटे यांनी जाहीर सभेत महापौरपदाचे आपणच उमेदवार असल्याचे जाहीर केले. आपला भाजप हा खरा, तर त्यांचा ‘संकरित भाजप’ अशी मांडणी करत त्यांनी विकासाचे शत्रू एकत्र आल्याची टीका केली होती.

वादाचा राष्ट्रवादीला फायदा?

भाजपने कारवाई केल्यास लोकसंग्राम पक्षामार्फत गोटे आपले उमेदवार रिंगणात उतरवू शकतात. भाजपला आणि प्रामुख्याने तीन मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यास काय चित्र असेल, याचे अंदाज बांधले जात आहेत. महापालिकेच्या निकालावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे समीकरण अवलंबून असेल. धुळे शहर विधानसभेच्या जागेवर डॉ. भामरे यांचा डोळा असल्याचा आरोप गोटे यांनी आधीही केला आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा उठवून महापालिकेवर वर्चस्व कायम राखण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 2:56 am

Web Title: maharashtra bjp mla anil gote unhappy with girish mahajan
Next Stories
1 ऐन हंगामात कापूसकोंडी
2 पश्चिम विदर्भात नवी समीकरणे?
3 राहुल गांधी सुद्धा धार्मिकतेकडे  झुकलेले नेते
Just Now!
X